मुंबई : मुंबईकरांनो येत्या काळात तुमच्या घरातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात येत्या काळात मुंबईकरांवर कचरा टॅक्स लावला जाण्याबाबत सूतोवाच करण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेकडून मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी लागू करण्यात आली आहे. मालमत्ता कराची वसूलीही धोरण रखडल्यामुळे रखडली आहे. तसेच जीएसटी प्रणालीमुळे जकातीतून मिळणारे महापालिकेचे उत्पन्नही बंद झालं आहे. त्यामुळे सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीतली आवक सध्या थंडावलीय. म्हणूनच, उत्पन्न वाढीसाठी महापालिकेकडून उत्पन्नाचे दुसरे पर्याय शोधले जात आहेत. म्हणूनच येत्या काळात महापालिका मुंबईकरांकडून कचरा, मलजल आणि इतर सेवांसाठीचे अतिरिक्त सेवाशुल्क वसूल करु शकते.
यंदाच्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कचरा शुल्क, मलजल शुल्क वसूल करण्याबाबत सूतोवाच करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या वचननाम्यानुसार मुंबईतल्या 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना कोणताही मालमत्ता कर आकारला जात नाही. मात्र येत्या काळात याच 500 स्क्वे. फुटांपर्यंतच्या घरांमधून जो कचरा बाहेर पडेल त्यावर मात्र कर आकारला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेचे उत्पन्न कमी झाले असले तरी कोणताही नवा कर लावण्यात आलेला नाही. मात्र कचरा संकलन शुल्क, मलजल संकलन शुल्क वसूल करण्याची नवीन पद्धत येत्या काही वर्षांत सुरू होणार आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणात मुंबईचा क्रमांक घसरला होता. त्यामुळे मुंबईकरांना कचरा संकलनाची शिस्त लावण्यासाठीही अशा प्रकारचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
कचरा निर्मुलन आकार
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या कर आणि शुल्क अशा स्वरुपात आकारणी होते. परंतु महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य असलेल्या कचर्याच्या निर्मुलनासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक सोसायट्यांना या कचर्याचे शुल्क आकारण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.