Ind Vs Eng | भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यामध्ये भारतीय संघाने 7 गडी राखून इंग्लंडचा पराभव केला. 20 षटकांच्या या सामन्यात 18 व्या षटकातच भारतीय संघानं विजयी पताका रोवली. या सामन्यात क्रीडारसिकांच्या मनाचा ठाव घेत पदार्पणातील खेळी गाजवण्याची किमया करुन गेला इशान किशन हा युवा खेळाडू.
वेगवान अर्धशतकी खेळी करणाऱ्या इशान किशन यानं संघातील खेळाडू, क्रीडारसिक यांच्यासमवेत निवड समितीलाही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली. या सामन्यानंतर तो एका खास मुलाखतीतही सहभागी झाला. युझवेंद्र चहल याच्या चहल टीव्ही या अनोख्या आणि विनोदी प्रकारात मोडणाऱ्या मुलाखत सत्रात किशननं त्याच्या या पदार्पणाच्या सामन्याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. यामध्ये अर्धशतकी खेळी, कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली याच्याकडून मिळालेला पाठिंबा याबाबतही त्यानं वक्तव्य केलं.
सलामीवीर म्हणून इशान किशन मैदानात आला. संघ काहीसा अडचणीत दिसत असतानाच त्यानं 32 चेंडूंमध्ये 56 धावा करत एक भक्कम धावसंख्या उभारली. चहलला दिलेल्या खास मुलाखतीत त्यानं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतरच्या काही मिनिटांबाबतच सांगितलं.
आपल्या अर्धशतकी खेळीबाबत काहीही शाश्वती नसल्याचं म्हणत जेव्हा विराट कोहली (विराट भाई) यानं ही इनिंग दमदार झाल्याचं म्हटलं तेव्हाच आपल्याला यावर विश्वास बसल्याचं तो म्हणाला. 50 धावांनंतर मैदानात बॅट उंचावण्याबाबत मी काहीसा संशयी भूमिकेत असतो. पण, यावेळी विराट (विराट भाई)नं मागून आवाज देत 'ओए चारो तरफ बॅट दिखा, सबको बॅट दिखा', अर्थात मैदानात चारही बाजूंना, सर्वांना बॅट दाखव असं म्हटलं होतं.
विराटसोबत खेळतेवेळी त्याच्यासारखं खेळणं आणि त्याचा वेग पकडणं हे तसं कठीणच ही बाबही त्यानं या मुलाखतीत स्पष्ट केली. विराटकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं, शिवाय हार्दीक आणि विराट सारख्या खेळाडूंनी आपल्याला खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिल्याचं म्हणत इशान किशन यानं आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यातील आठवणींचा ठेवा सर्वांपुढे मांडला.