India vs Australia 3rd Test भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. त्यातही भारतीय क्रीडा रसिकांमध्ये तर, या संपूर्ण मालिकेबाबत कमालीची उत्सुकता दिसत आहे. हीच उत्सुकता आणि कुतूहल कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतं, याचाच एक प्रत्यय सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. जिथं एका गृहस्थांचा फोटो व्हायरल होत आहे. बरं, हा फोटो व्हायरल होण्यामागे कारणही तसंच आहे.


हे कारण म्हणजे या काकांनी (rohit sharma) रोहित शर्माच्या नावे लावलेली एक पैज हरल्यामुळं थेट स्वत:ची अर्धी मिशीच कापली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने टीम इंडियाची चांगली सुरुवात केली. रोहित फार, प्रभावी खेळ खेळू शकला नाही. तो, अवघ्या 26 धावा करून बाद झाला.


असं असलं तरीही रोहितनं बाद होण्यापूर्वी एका विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्यानं आपल्या नावे केला. पण, इथं त्याच्या याच खेळीमुळं एका काकांना त्यांच्या मिशीला मुकावं लागलं. तेही अर्ध्या मिशीला.


IND Vs AUS 3rd Test Live Score Updates | भारताचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला, ऑस्ट्रेलियाकडे 94 धावांची आघाडी


रोहितला कसोटी संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला, त्यामुळं त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळाला. पण, अजय नावाच्या एका ट्विटर युजरनं ट्विट करत, 'रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम् पुरुष आहे. ब्रॉड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो', असं लिहिलं.








ट्विटरवरच एका युजरच्या ट्विटला प्रतिक्रिया देत त्यांनी हा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. पण पुढं जे काही झालं, त्यामुळंच ते चर्चेचा विषय ठरले. इथं रोहितनं 30 नव्हे तर 77 चेंडू खेळून दाखवले आणि तिथं पैज हरल्यामुळं या गृहस्थांनी चक्क अर्धी मिशी कापली. त्यांचा हा फोटो पाहून प्रथमत: अनेकांना धक्काच बसला. पण, त्यावरही यांनी स्पष्टीकरण देत लिहिलं, 'बऱ्याच जणांनी मी अर्धी मिशी काढल्याबद्दल मला नांवे ठेवली. पण मला माझ्या क्रिकेटवेडेपणाचा खूप अभिमान होता आणि आहे. तरी देखील मी सिडनी डोळ्यासमोर असताना पैज लावण्याची चूक केली. म्हणून खूप विचारांतीच मी अर्धश्मश्रूमुंडन केलंय'. सोशल मीडियावर हे काका आणि त्यांचं क्रिकेटप्रेम सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.