भंडारा : महाराष्ट्र आणि साऱ्या देशाच्याच काळजात चर्रdsss करणारी घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळं गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.


दरम्यान, रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश रुग्णालय परिसरात पाहायला मिळत आहे. अवघ्या काही महिन्यांच्या आणि एक वर्ष होण्यासाठी काही दिवस शिल्लक असणाऱ्या बालकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं कळत आहे. आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, हे वृत्त कळताच रुग्णालय परिसरात त्यांच्या मातांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं.


रुग्णालयाकडून आपल्याला कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती देण्यात येत नव्हती, अद्यापही पूर्ण माहिती दिली जात नाहीयं, बालकांना भेटूही दिलं जात नाहीयं त्यामुळं पालकांमध्ये आणि मृत बालकांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट आहे. काही पालकांना त्यांचं बाळ हयात आहे, की नाही याबाबतही स्पष्टोक्ती नाही. त्यामुळं त्यांच्या मनात वेगळाच काहूरही माजला आहे. सदर घटना ही रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळंच घडल्याचं म्हणत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.



भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू


सदर घटनेची माहिती घेताच बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. पण, इथं परिस्थिती मात्र हाताबाहेर गेली असून त्यांना कोणाकडूनही मदत मिळत नसल्यामुळं आधीच दु:खाचा डोंगर आणि त्यात अधिकृत माहितीअभावी त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.


चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मातांची आणि नातेवाईकांची झालेली अवस्था मन हेलावणारी आहे. दरम्यान, अनेक नेतेमंडळी आणि स्थानिक नेतेमंडळींनी या घटनास्थळाचा आढावा घेतला. स्थानिक आमदारांनी घटनास्थळी भेट देत या बेजबाबदारपणासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.



रुग्णालयात नेमकं काय झालं?


जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळं त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितलं. ज्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.