बंगळुरु: भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानची दुबळी फलंदाजी उखडून काढली. बंगळुरु कसोटीत अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 109 धावांत आटोपल्याने, त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली.
भारताला पहिल्या डावात 365 धावांची आघाडी मिळाली.
भारताच्या आर अश्विनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर रवींद्र जाडेजा आणि इशांत शर्माने प्रत्येकी 2 फलंदाज तंबूत धाडले.
भारतीय गोलंदाजीसमोर नवख्या अफगाणिस्तानी फलंदाजांना तग धरता आला नाही. त्यामुळेच मोहम्मद नबी वगळता एकाही फलंदाजाला वैयक्तिक 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. मोहम्मद नबीने सर्वाधिक 24 धावा केल्या.
अफगाणिस्तानचे फलंदाज दुसऱ्या डावात पुन्हा फलंदाजीसाठी उतरले आहेत. त्यांच्यावर डावाने पराभवाची नामुष्की आहे.
भारताचा पहिला डाव
त्याआधी दमदार सुरुवातीनंतरही भारताचा पहिला डाव 474 धावांवर आटोपला.
या कसोटीत भारताच्या शिखर धवन आणि मुरली विजय यांनी दमदार 168 धावांची सलामी दिली होती. धवनने तर पहिल्या दिवसाच्या उपहारापूर्वीच शतक ठोकलं होतं. त्यामुळे भारत अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा डोंगर उभा करेल अशी अपेक्षा होती.
मात्र मधली फळी ढेपाळल्यामुळे भारताला 500 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
भारताकडून शिखर धवन (107), मुरली विजय (105) यांनी शतकं झळकावली. तर हार्दिक पंड्या (71), के एल राहुल 54 यांनी अर्धशतकं ठोकली.
धवननं सहवागची वृत्ती घेतली, आता धावांची भूकही घ्यावी!
भारताने कालच्या 6 बाद 347 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. हार्दिक पंड्या आणि आर अश्विनने दुसऱ्या दिवशी आधी सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विन लगेचच माघारी परतला. मग पंड्याच्या साथीला जाडेजा आला. या दोघांनी आक्रमक खेळी केली. पंड्याने 94 चेंडूत 10 चौकारांच्या सहाय्याने 71 धावा ठोकल्या.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने भारतीय फलंदाजांना तंबूत धाडत, धावसंख्येला आळा घातला. शेवटी राशिद खानने इशांत शर्माला पायचित करत, भारताचा डाव 474 धावांत गुंडाळला.
अफगाणिस्तानच्या यामीन अहमदझाईने सर्वाधिक 3 तर वफादार आणि राशिद खानने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
अफगाणिस्तानला 109 धावांत गुंडाळलं, फॉलोऑनची नामुष्की
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jun 2018 02:56 PM (IST)
बंगळुरु कसोटीत अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 109 धावांत आटोपल्याने, त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. भारताला पहिल्या डावात 365 धावांची आघाडी मिळाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -