मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची घोषणा झाली. पहिला सामना राजकोट, तर दुसरा सामना हैदराबादमध्ये खेळवण्यात येईल. कसोटीशिवाय पाच वन डे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली.

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चार ते आठ ऑक्टोबर दरम्यान राजकोटमध्ये, तर दुसरा सामना 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.

कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये 21 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होईल. पहिला सामना 21 ऑक्टोबरला गुवाहटी, दुसरा 24 ला इंदूर, तिसरा 27 ला पुणे, 29 ला मुंबई आणि पाचवा वन डे सामना एक नोव्हेंबरला तिरुवअनंतपुरममध्ये होईल.

यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरु होईल. या मालिकेतील पहिला सामना चार नोव्हेंबरला कोलकात्यात, दुसरा सहा नोव्हेंबरला लखनौमध्ये आणि तिसरा सामना 11 नोव्हेंबरला चेन्नईत खेळवला जाईल.

वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अगोदरच 15 सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. 36 वर्षीय फलंदाज ड्वेन स्मिथला वगळण्यात आलं आहे, तर 21 वर्षीय अल्जारी जोसेफचं एक वर्षानंतर पुनरागमन होत आहे.

युवा गोलंदाज कीमो पॉललाही संघात स्थान मिळालं आहे. गोलंदाजीची मदार सुनील अम्बरीस आणि कहलर हेमिल्टन यांच्यावरही असेल. वेस्ट इंडिज संघाचं नेतृत्त्व जेसन होल्डर करणार आहे.