मुंबई : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आणि सन्मानार्थ देशभरात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. याचनिमित्ताने गुगलनंही 'अॅनिमेटेड' डूडल बनवून जगभरातल्या शिक्षकांना अनोखं गिफ्ट दिलं आहे.


गुगलने या डूडलमध्ये 'G'या अक्षराला पृथ्वी दाखवण्यात आली आहे. या पृथ्वीवर एक चष्मासुद्धा लावण्यात आला आहे ज्याने आपल्याला एखाद्या शिक्षकाचा भास होतो. ही पृथ्वी काही काळ फिरते आणि नंतर थांबते. पृथ्वी फिरायची थांबताच त्यातून गणित, विज्ञान, अंतराळ, संगीत, खेळाशी संबंधित चिन्हं बाहेर येतात.

अत्यंत सुंदर असं हे अॅनिमेटेड डूडल आहे. जगभरातील शाळा आणि महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकांसाठी गुगलने हे खास डुडल तयार केले आहे.

दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. 1962 मध्ये जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा लोकांनी 5 सप्टेंबर हा दिवस राधाकृष्णन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र राधाकृष्णन यांनी या निर्णयाला विरोध केला आणि याऐवजी आपण देशातील सगळ्या शिक्षकांचा सन्मान म्हणून शिक्षक दिवस साजरा करू असा प्रस्ताव मांडला. तेव्हापासून शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबरला साजरा केला जातो.