मुंबई : मुली पळवण्याच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजप आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुन खेद व्यक्त केला आहे. मात्र, आपल्या बेताल वक्तव्याबाबत राम कदमांनी अद्यापही माफी मागितली नाही.


राम कदमांकडून खेद व्यक्त

“कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. अर्धवट 54 सेंकंदांचं विधान काही विरोधकांनी पसरवून संभ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी! आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यांनी आक्षेप घेतला नाही, कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकले होते.”, असे राम कदम यांनी ट्वीट केले आहे.



दहीहंडीच्या कार्यक्रात राम कदम नेमकं काय म्हणाले होते?

"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या.  जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.

VIDEO : राम कदमांची मुक्ताफळं



राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका

आमदार राम कदमांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे.

“भाजपाचे आमदार राम कदम यांनी काल दहीहंडीत मुक्ताफळे उधळली आहेत. लग्नासाठी मुलींना पळवून नेण्याची विधाने करणारे राम कदम हे कोणत्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत? इथून पुढे महाराष्ट्रात मुली पळवून नेण्याचे प्रकार झाले तर त्याचा पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल करण्यात यावा.”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर, असं करायला आमदार म्हणजे काही राजा नाही. आजचं राज्य हे लोकशाहीचं, कायद्याचं राज्य आहे. मुलीला पळवून आणण्याचं आमदारांचं वक्तव्य भीतीदायक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

“राम कदम यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगायला हवं. आपण काय करतोय, कुणासमोर बोलताय, उत्साहाच्या भरात काय बोलतोय याचं भान सत्ताधाऱ्यांना राहिलं नाही. आज महिलांची स्थिती बिकट आहे, त्या असुरक्षित आहेत. त्यात अशी वक्तव्य करुन राम कदमांना नक्की काय म्हणायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं”, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

‘माझा’चा महाराष्ट्राला शब्द!

राम कदम जोपर्यंत बेताल वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागत नाहीत, तोपर्यंत ते एबीपी माझाच्या चर्चेत दिसणार नाहीत, अशी भूमिका एबीपी माझाने घेतला आहे.