Saina Nehwal: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला (Saina Nehwal) संधिवाताचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. सायना नेहवालने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. तसेच या संधिवाताच्या त्रासामुळे या वर्षाअखेरीस निवृत्ती जाहीर करण्याचा विचार करत असल्याची माहिती देखील सायनाने दिली. सायना नेहवाल ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तसेच सायनाने 2010 आणि 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
सायना नेहवाल (Saina Nehwal) म्हणाली की, मला खेळणे अवघड झाले आहे, हे खरे आहे. माझी कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. सध्या गुडघ्याची स्थितीही चांगली नाहीय. संधीवाताचा देखील त्रास सुरु आहे. त्यामुळे मला 7-8 तास सरावात गुंतून राहणे आता शक्य नाही. विजय मिळवण्यासाठी फक्त 2 तासांचा सराव पुरेसा नाहीय. त्यामुळे मी निवृत्तीचा विचार करतेय. निवृत्तीचा काय परिणाम होणार, हे देखील बघावं लागेल, असं सायनाने सांगितले.
मी तीन ऑलिम्पिक खेळले पण...
खेळाडूची कारकीर्द फार छोटी असते. मी वयाच्या नवव्या वर्षी कोर्टवर आले. पुढच्या वर्षी 35 वर्षांची होईन. माझी कारकीर्द लांबलचक राहिली याचा गर्व आहे. जे काही मिळविले, त्याविषयी आनंदी आहे. वर्षअखेरपर्यंत दुखापतींचे आकलन करीत राहणार आहे. ऑलिम्पिक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मी तीन ऑलिम्पिक खेळले पण सलग दोन ऑलिम्पिकला मुकले याची खंत आहे. मी जे सामने खेळले त्यात शंभर टक्के योगदान दिल्याचा आनंद आणि गर्व वाटतो. असे पद्मश्री पुरस्कारप्राप्त सायनाने सांगितले.
सायना नेहवालची कारकीर्द-
बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अनेक मोठे विक्रम आपल्या नावार केले आहेत. सायनाचे आई-वडिलदेखील बॅडमिंटन खेळाडू होते. सायनाने हैदराबादच्या एलबी स्टेडियमधून बॅडमिंटनची ट्रेनिंग घेतली. सायनाने द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त एसएम आरिफ यांच्याकडून बॅडमिंटनचे धडे घेतले. सायनानेच भारताला बॅडमिंटनचे पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. सायना नेहवालला 2009-10 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2010 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभुषण या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. सायनाने 2009 मध्ये इंडोनेशिया ओपनचे जेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय होती. याशिवाय सायनाने 2010 मध्ये सिंगापूर ओपन, इंडिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड, हाँग काँग सुपर सीरीज यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे.
संबंधित बातमी:
सुमित अंतिलने रचला इतिहास; पॅरालिम्पिकमध्ये पटकावलं सुवर्णपदक, स्वत:चा ऑलिम्पिक विक्रमही मोडला