बर्मिंगहम: अब आयेगा क्रिकेट का असली मजा... कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं रणांगण सज्ज झालं आहे भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या महामुकाबल्यासाठी. एकमेकांचे सख्खे शेजारी, पण कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांसाठी विजेतेपदाच्या ट्रॉफीइतकाच एकमेकांविरुद्धचा विजयही तितकाच प्रतिष्ठेचा असतो. त्यामुळं भारत-पाकिस्तान संघांमधला क्रिकेटचा सामना हा उभय देशांमधल्या नागरिकांसाठी राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनतो.


चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या या भारत-पाकिस्तान लढाईच्या निमित्तानं विश्वचषकाचा इतिहास पाहायचा झाला, तर भारताचं पाकिस्तानवर 10-0 असं निर्विवाद वर्चस्व आहे. वन डेच्या विश्वचषकात भारतानं सहापैकी सहा सामन्यांत पाकिस्तानला लोळवलं आहे, तर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतानं चारपैकी चार सामन्यांत पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीत मात्र पाकिस्तानच्या भारतावरच्या विजयाचं समीकरण हे 2-1 असं सरस आहे

भारत-पाकिस्तान संघांमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे उभय संघ तब्बल 15 महिन्यांनी आमनेसामने येत आहेत. भारत-पाकिस्तानमधला अखेरचा सामना हा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात दिनांक 19 मार्च 2016 रोजी खेळवण्यात आला होता. कोलकात्याच्या त्या सामन्याआधी दोन्ही संघ वन डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियातल्या अॅडलेड ओव्हलवर एकमेकांना भिडले होते. तारीख होती 15 फेब्रुवारी 2015. या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याला आधीच्या इतिहासावर कसं जोखायचं?

त्यामुळंच विराट कोहलीची टीम इंडिया आणि सरफराज अहमदची पाकिस्तानी फौज यांच्यात होणाऱ्या बर्मिंगहॅमच्या लढाईकडे भारत-पाकिस्तान क्रिकेटिंग रायव्हलरीचा फ्रेश स्टार्ट म्हणून पाहिलं जात आहे.

क्रिकेटिंग रायव्हलरीच्या नव्या जमान्यात पहिला बदल हा भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्त्वात झाला आहे. महेंद्रसिंग धोनीनं तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्त्वाची बॅटन विराट कोहलीच्या हाती सोपवली आहे. पाकिस्तानच्या नेतृत्त्वातही बदल होत होत ती जबाबदारी आता यष्टिरक्षक सरफराज अहमदच्या खांद्यावर आहे.

विराट कोहलीचं बलस्थान म्हणजे त्याच्या पाठीशी धोनीचा अनुभव आहेच, पण शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा ही मंडळीही आता परिपक्व झाली आहेत. पण मिसबाह अल हक, शाहिद आफ्रिदी, युनूस खानच्या निवृत्तीनं सरफराजच्या पाठीशी अनुभवी वीर उरलेला नाही. अनुभवाच्या आघाडीवर त्याची भिस्त प्रामुख्यानं शोएब मलिकवरच राहिल. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानी फलंदाज म्हणजे टीम इंडियासाठी कोरा करकरीत अनुभव आहे.

मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, जुनैद खान, हसन अली आणि फहिम अश्रफ यांच्यासारख्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणाची धार अजूनही कायम ठेवली आहे. पण भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांच्यामुळं भारताचा तोफखानाही आता तेजीत धडधडायला लागला आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद हफिज, शादाब खान आणि इमाद वासिम यांच्या फिरकीला भारताकडे अश्विन आणि जाडेजाचं उत्तर आहे.

भारत आणि पाकिस्तान संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर झालेली तुलना पाहता, टीम इंडियाचं पारडं जड भासतं. पाकिस्तानचा संघ हा बेभरवशाचा असला तरी तो कधीही धोकादायक ठरू शकतो.

भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे एक अग्निदिव्य असतं. आणि या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघणारे वीर आपल्या देशाला विजयाचा नजराणा भेट करत असतात. बर्मिंगहॅमच्या लढाईत ते वीर विराटच्या टीम इंडियाचे असावेत, हीच सदिच्छा.