काहींचा शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2017 08:25 PM (IST)
NEXT PREV
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. पण काही लोकांना शेतकऱ्यांच्या नावानं राज्यात अराजक पसरवायचं आहे, असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ''राज्यात काही लोकांना अराजक पसरवायचं आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा संप संपूच, नये असं वाटतं. म्हणून ते शेतकऱ्यांच्या आडून राजकरण करत आहेत. पण राज्य सरकार आपलं काम करत राहिल.'' शिवसेना आणि राजू शेट्टी यांनी शेतकरी संपाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ''राजू शेट्टींनी आत्मक्लेश यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा करण्याची भूमिका घेतली. पण त्यांनी माझाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली नाही. त्यांच्याच पक्षाचेच नेते सदाभाऊ खोत मंत्रिमंडळात असाताना त्यांनी ही भूमिका घेतली.'' शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ''राज्य सरकारनं कित्येक पटीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील 80 टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच ही कर्जमाफी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात पहिला मिळेल. शिवाय देशातील कोणत्याही राज्यातल्या राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी दिलेली नाही,'' असंही त्यांनी यावेळी स्पष्टं केलं. संबंधित बातम्या