Lakshya Sen Wins Final: भारतीय खेळाडूंनी यंदा इंडिया ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकीकडे चिराग-सात्विक जोडीने पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकल्यानंतर आता युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या स्पर्धेत विश्वविजेत्या लोह कीन यीव याला मात देत विजय मिळवला आहे. लक्ष्यने 24-22 आणि 21-17 अशा दोन सेट्समध्ये हा सामना जिंकला आहे. या मोठ्या विजयानंतर लक्ष्य कमालीचा आनंदी दिसत होता. दरम्यान डीडी इंडियाने याच वेळचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.



लक्ष्यने नुकतंच मागील वर्षी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर आता आणखी एका मोठ्या स्पर्धेत विजय मिळवल्यामुळे लक्ष्यने आणखी एक पदक खिशात घातलं आहे. विजयानंतर लक्ष्यने आपली प्रतिक्रिया दिली तो म्हणाला, 'हा माझ्यासाठी एक महत्वपूर्ण सामना होता. सुरुवातीला सामन्यात आम्ही बरोबरीत होतो. पण मी पहिला सेट जिंकल्यानंतर माझा आत्मविश्वास अधिक वाढला.' 


दोन सेट्मसमध्ये लक्ष्य विजयी


लक्ष्य आणि लोह यांच्यातील या अटीतटीच्या सामन्यात लक्ष्यने दोन सेट्समध्ये विजय मिळवला. तब्बल 54 मिनिटं चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये लक्ष्यने सुरुवातीला उत्तम कामगिरी केली. त्याने 16-9 ची आघाडी मिळवली. नंतर लोहनेही प्रतित्यूर करत 19-14 अशी गुणसंख्या केली. एका क्षणी दोघांचा स्कोर 20-20 असा समान होता. पण लक्ष्यने अखेरच्या क्षणात कमाल कामगिरी करत 24-22 च्या फरकाने सेट जिंकला. पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यने आणखी चमकदार कामगिरी करत 21-17 च्या फरकाने सेट जिंकत सामन्यात विजयश्री मिळवला.


अशी कामगिरी करणार तिसरा भारतीय  


लक्ष्य सेने याप्रकारे सुपर 500 मध्ये विजय मिळवल्याने तो अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय पुरुष ठरला आहे. याआधी दोन भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंनी ही कामगिरी केली आहे. यामध्ये 1981 मध्ये प्रकाश पादुकोण आणि 2015 मध्ये किदाम्बी श्रीकांत यांनी अशाप्रकारे सुपर 500 चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. 


पुरुष दुहेरीतही भारत विजयी


चिराग आणि सात्विक यांनी पुरुष दुहेरीमध्ये इंडोनेशियाच्या हेंड्रा सेतियावान आणि मोहम्मद एहसान यांना मात दिली. या सामन्यात चिराग आणि सात्विक यांनी दोन सेट्मसमध्ये हा विजय मिळवला आहे. यामध्ये पहिल्या सेटमध्ये चिराग आणि सात्विकने धमाकेदार खेळ दाखवला. ज्यामुळे हा सेट त्यांनी 21-16 अशा चांगल्या फरकाने नावावर केला. तर दुसऱ्या सेटमध्ये मात्र इंडोनेशियाच्या खेळाडूंनी सामन्यात पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण अखेर या अटीतटीच्या सेटमध्ये देखील 26-24 ने चिराग-सात्विक जोडीनेच विजय मिळवत चॅम्पियनशिपचा खिताब पटकावला. 


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha