IND vs AUS 2022 Viral Video : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना पार पडणार आहे. मात्र सोशल मीडियावर दुसऱ्या सामन्यातील एक व्हिडीओ शेअर होतोय, जो नागपूरच्या मैदानातील आहे. तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपुरात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. पावसामुळे हा सामना 8-8 षटकांचा खेळवला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 8 षटकांत 90 धावा केल्या. भारतानं ते लक्ष्य रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या बळावर पूर्ण केलं. मात्र या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आलाय,ज्यामुळं चाहत्यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केला आहे. पावसानं ओलं झालेलं मैदान सुकवण्यासाठी चक्क हेअर ड्रायर वापरला जात असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
हेअर ड्रायरने खेळपट्टी कोरडे केल्याने चाहते संतापले
या सामन्यापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर चाहते संतापले असून बीसीसीआयला खूप ट्रोल केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी हेअर ड्रायरने कोरडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आणि बीसीसीआयला जोरदार ट्रोल केले आहे.
सोशल मीडियावर एका चाहत्याने लिहिले आहे की, BCCI ला काहीच वाटत नाही का? तुमच्याकडे पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नसताना इतके पैसे वाया घालवण्यात काय अर्थ आहे. चाहत्याने पुढे लिहिले की इतके पैसे मिळतात मग सर्व पैसे जातात कुठे, असा सवाल चाहत्यांनी केला आहे.
या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव केला होता. भारतीय संघाने 7.4 षटकात 91 धावा करत सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 20 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. याशिवाय दिनेश कार्तिकने 2 चेंडूत 10 धावा करत सामना संपवला.