आयपीएलनंतर आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती टीम इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याची. शुक्रवारी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली पहिली वन डे खेळणार आहे. आणि या वन डेचं आयोजन केलं जातंय सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर. सिडनी हे ऑस्ट्रेलियातलं सर्वात मोठं शहर तर आहेच पण ते देशाची आर्थिक राजधानीही आहे. पाहूयात भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेच्या पार्श्वभूमीवर सिडनी शहराची इतर काही वैशिष्ट्यं...
सिडनी हे शहर ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्स राज्याची राजधानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडे टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सिडनीची लोकसंख्या जवळपास 55 लाख एवढी आहे. 26 जानेवारी 1778 साली या शहराची स्थापना झाली होती. हे शहर म्हणजे सुरुवातीला ब्रिटिश कैद्यांच्या वस्तीचं ठिकाण होतं.
सिडनीतील प्रेक्षणीय स्थळे
जगप्रसिद्ध ऑपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर ब्रिज ही दोन प्रसिद्ध पर्यटन स्थळं सिडनीच्या सौंदर्यात भर टाकतात. ऑपेरा हाऊस हे सिडनीतील एक बंदिस्त नाट्यगृह आहे. यॉर्न उत्झन या डच स्थापत्यकारानं ऑपेरा हाऊस उभारलं होतं. इथं अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. जगातल्या वर्दळीच्या नाट्यगृहांपैकी एक अशी ऑपेरा हाऊसची ओळख आहे.
सिडनी हार्बर ब्रिज हेदेखील शहरातलं एक महत्वाचं ठिकाण आहे. 1932 साली वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या या प्रसिद्ध पुलावरुन रेल्वे, वाहनं, सायकली आणि पादचाऱ्यांचीही वर्दळ असते.
सिडनीला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. इथे 40 पेक्षा जास्त सुंदर समुद्रकिनारे आहेत. कूची, क्रोन्यूला, कोलोरॉयल आणि पाम बीच हे त्यापैकी काही प्रमुख आहेत.
सिडनी क्रिकेट ग्राऊंड
सिडनी क्रिकेट ग्राऊंड हे ऑस्ट्रेलियातलं एक जुनं आणि महत्वाचं स्टेडियम आहे. ज्याची उभारणी 1848 साली करण्यात आली होती. याच ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या दोन वन डे, दोन ट्वेन्टी ट्वेन्टी आणि एक कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. सध्या याठिकाणी सामन्यासाठीची तयारी जोरात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजनांना सध्या सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येत आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया लढतीसाठी सिडनीतील चाहते उत्सुक
शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यासह सिडनीतल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी चाहते उत्सुक आहेत. सिडनीत मूळचे भारतीय असलेल्यांची संख्या अधिक आहे. इथं जवळपास 4 लाख भारतीय राहतात. आणि अनेकांनी शुक्रवारी रजाही टाकल्या आहेत. कारण त्यांना पाहायचाय भारत-ऑस्ट्रेलिया पहिला वन डे सामना...