मुंबई : देशभरात दिवाळीनंतर कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता काही राज्यांनी संचारबंदी लावण्यास सुरुवात केली आहे. गुजरातच्या अहमदाबाद आणि मध्य प्रदेशातील पाच शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये शाळा आणि बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता लग्नसोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या पुन्हा कमी करण्यात आली आहे.


सरकारने हळूहळू नियम शिथिल केले आहेत. मात्र, असे असले तरी मोठ्या प्रमाणात नागरिक लग्नसोहळ्यात सहभागी होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराची संभाव्य दुसरी लाट येण्याची शक्यता घेता प्रत्येक राज्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी दिली आहे.




  • दिल्ली - 50

  • उत्तर प्रदेश -100

  • राजस्थान- 100

  • मध्य प्रदेश- 200

  • गुजरात100

  • महाराष्ट्र 50

  • हरियाणा 50-100 ( दिल्ली जवळील 6 जिल्हे, इनडोअर - 50, रिकाम्या जागेत- 100)
    100-200 (इतर जिल्ह्यांमध्ये इनडोअर 100, रिकाम्या जागेत- 200)


राजस्थानमध्ये कलम 144


राजस्थान सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 21 नोव्हेंबरपासून कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्याची सूचना दिली आहे. गृह विभागाच्या ग्रुप-9 च्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्देश जारी केले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राजस्थानमध्ये थंडीसोबतच नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढण्यास सुरु झाली आहे. राजस्थानमध्ये 19 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच एका दिवशी अडीच हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.