बुमराच्या 5 विकेट्स, श्रीलंकेला 217 धावांवर रोखलं
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2017 02:14 PM (IST)
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून यजमानांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
फोटो सौजन्य : बीसीसीआय ट्विटर हँडल
कॅण्डी : भारताच्या जसप्रीत बुमराने 27 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून, कॅण्डीच्या तिसऱ्या वन डेत श्रीलंकेला नऊ बाद 217 धावांत रोखलं. त्यामुळे हा सामना आणि मालिकाही जिंकायची, तर टीम इंडियासमोर 50 षटकांत 218 धावांचं लक्ष्य आहे. लहिरू थिरीमनेच्या 80 धावांच्या झुंजार खेळीचा अपवाद वगळता, श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर पुन्हा नांगी टाकली. त्यात जसप्रीत बुमराने पाच विकेट्स काढून श्रीलंकेला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेतही चार विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता. भारत आणि श्रीलंका संघांमधला तिसरा वन डे सामना कॅण्डीच्या मैदानात खेळवला जात आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असली, तरी श्रीलंकेला कमी लेखता येणार नाही. कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत तर धोनी आणि भुवनेश्वर कुमारनं रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीमुळेच टीम इंडिया पराभवाच्या संकटातून बालंबाल बचावली. दम्बुलापाठोपाठ कॅण्डीच्या वन डेतही विजय साजरा करुन विराट कोहलीच्या फौजेने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि श्रीलंका संघ कॅण्डीच्या पल्लिकल स्टेडियमवर तिसऱ्या वन डेत पुन्हा आमनेसामने आला आहे. ही वन डे जिंकून टीम इंडियाला पाच सामन्यांची मालिका खिशात घालण्याची नामी संधी आहे.