IND vs SA 1st ODI : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने दक्षिण आफ्रिकेमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. तगड्या दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 116 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी हे आव्हान अवघ्या 16.4 षटकांमध्ये पार करत मोठ्या विजयाची नोंद केली. टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने पहिल्याच सामन्यात आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवताना नाबाद 55 धावांची खेळी केली, तर त्याला श्रेयसने 52 धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड अवघ्या पाच धावांवर बाद झाला. श्रेयस अर्धशतक करून बाद झाल्यानंतर विजयाची औपचारिकता साई सुदर्शन आणि तिलक वर्माने पूर्ण केली.
'द वांडरर्स' येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना खूप मदत केली. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने रीझा हेंड्रिक्सला (0) बोल्ड केले. अर्शदीपने पुढच्याच चेंडूवर रॅसी व्हॅन डर डुसेनलाही (0) बाद केले. टोनी डी जॉर्जीला (28) देखील अर्शदीपने बाद केले. हेनरिक क्लासेनही (6) अर्शदीपचा बळी ठरला. पहिल्या चार विकेट अर्शदीपने घेतल्या.
आवेश खानकडून मधल्या फळीत खिंडार
अर्शदीपनंतर आवेश खानने दक्षिण आफ्रिकेला धक्के दिले. आवेशने एडन मार्करमला (12) बोल्ड केले, तेव्हा स्कोअरबोर्डवर केवळ 52 धावा होत्या. अवेशने पुढच्याच चेंडूवर वियान मुल्डरला (0) एलबीडब्ल्यू केले. डेव्हिड मिलर (25) धावा करून बाद झाला. आवेश खानने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फेहलुकवायोने एका बाजूने डाव सांभाळत केशव महाराज (4) सोबत 15 आणि नांद्रे बर्जर (7) सोबत 28 धावा जोडल्या. आवेशने केशव महाराजला बाद केले, तर फेहलुकवायोला (33) अर्शदीपने बाद केले. तबरेझ शम्सीने 8 चेंडूत 11 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीपने पाच, आवेश खानने चार आणि कुलदीप यादवने एक विकेट घेतली.
सई आणि श्रेयसची शानदार खेळी
117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने लवकरच सलामीवीर ऋतुराज गायकवाडची (5) विकेट गमावली. पण यानंतर श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांच्यात 88 धावांची जलद भागीदारी झाली. श्रेयस अय्यर 111 धावांवर बाद झाला. त्याने 45 चेंडूत 52 धावा केल्या. साई सुदर्शन 43 चेंडूत 55 धावा करून टिळक वर्मा (1)सह नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा प्रकारे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 16.4 षटकांत 2 विकेट गमावून पराभव केला.
इतर महत्वाच्या बातम्या