Ind Vs Eng भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या PayTM Test match मध्ये जो रुटनं संघासाठी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती, हे सारेच जाणत होते. तर, फिरकी गोलंदाजांना याचा थेट पाचव्या दिवशी फायदा होईल असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं. पहिल्या दिवसाच्या खेळाची सुरुवात पाहुण्या संघानं बेतानंच केली. बर्न्स आणि सिब्लेनं एक स्थिऱ भागीदारी केली. 63वर संघाची धावसंख्या असतानाच इंग्लंडचा बर्न्स अश्विनच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारताना बाद झाला.


खेळपट्टी गोलंदाजांच्या बाजूनं नसताना आणि फलंदाजीसाठी पूर्णपणे पूरक असताना संघासाठी एक मोठ्या आकड्याची धावसंख्या आणि भागीदारी करण्याच्याच वेळी गरज नसताना त्यानं हा फटका मारण्याचं धाडस केलं. पण, इंग्लंडच्या खेळाडूंनी खेळपट्टीवर तग धरला आणि यजमान भारतीय संघाला घाम फुटू लागला. असं असलं तरीही स्टंपच्या मागे यष्टीरक्षणासाठी उभ्या असणाऱ्या पंतांनी अर्थात ऋषभ पंत यानं मात्र क्रीडारसिकांना एका वेगळ्यात प्रकारे गुंतवून ठेवलं.


मागील काही वर्षांमध्ये स्टंप माईकमध्ये खेळाडूंच्या बोलण्यानं अनेक चर्चा झाल्या आहेत. कित्येकदा अनेकांच्या चेहऱ्यावर यातून हास्यही खुललं आहे. भारतीय संघात महेंद्रसिंह धोनीप्रमाणंच आता ऋषभ पंतही विकेटमागे उभा राहून काहीना काही प्रतिक्रिया देत असतो. संघातील खेळाडूंना सल्लाही देत असतो.


इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीही त्याचा असाच अंदाज पाहायला मिळाला. भारतीय संघाकडून गोलंदाजीमध्ये ज्यावेळी पहिला बदल करत रविचंद्रन अश्विन गोलंदाजीसाठी पुढं आला, तेव्हाच पंत स्टंपमागून काहीतरी पुटपुटण्यास सुरुवात झाली. पंतनं पुढं केलेली संपूर्ण बडबड स्टंप माईकमध्ये ऐकू आली.


डावखुऱ्या बर्न्सला अश्विननं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकणं अपेक्षित होतं. त्यामुळं त्याला हाच सल्ला देत पंत म्हणाला, 'इधर से बढीयाँ है, उधर से फसेगा तो मजा आएगा...'. बरं तो इतक्यावरच थांबला नाही, 'चलो यार, ढिले नही... ', 'कोई दिक्कत नही... ', 'सिधा रखो अॅश भाई....', अशी पंतची अविरत बडबड सुरुच होती. याच कारणामुळं नेटकऱ्यांनीही स्टंपमागं बोलत राहणाऱ्या आणि संघातील खेळाडूंचं एक प्रकारे प्रोत्साहन वाढवत त्यांना मदतही करणाऱ्या पंतचीच चर्चा सुरु झाली. त्याचसंदर्भात काही मीम्सही व्हायरल झाले.










बरं, या साऱ्यामध्ये जेव्हा अश्विननं पंतला जरा मागे होण्यात सांगितलं, त्यावर उत्तर देत तो म्हणाला, 'नही मै ऐसे प्रेशर बना रहा हूँ'. म्हणजेच मी अशा पद्धतीनं विरोधी संघावर दबाव टाकतोय. शाहबाज नदीम गोलंदाजीसाठी आला, तेव्हाही त्याला थेट स्टंपमध्येच गोलंदाजी करण्याचा सल्ला पंतनं दिला होता. त्यामुळं एकिकडे इंग्लंडची फलंदाजी जरी पहिला दिवस गाजवून गेली असली तरीही इथं भारतीय संघाकडून विकेटमागे उभ्या असणाऱ्या पंतची आगळीवेगळी शैलीही तितकीच गाजली असं म्हणायला हरकत नाही.