मुंबई : 'बिग बॉस'शोच्या टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकडचा मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये एका अपघातात मृत्यू झाला आहे. ती 24 वर्षांची होती. 'बिग बॉस'शोची निर्माता कंपनी एंडमॉल शाइन इंडियासोबत गेल्या अनेक वर्षांपासून ती कार्यरत होती. मुंबई फिल्मसिटीमध्ये 'बिग बॉस'च्या सेटवर अभिनेता सलमान खान (Salman Khan)सोबत 'विकेंड का वार'च्या खास एपिसोडचं शूटिंगनंतर ती आपल्या अॅक्टिवावरुन घरी परतत होती. त्याचवेळी तिचा अपघात झाला. याच अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बिग बॉसच्या वेगवेगळ्या सीझनमधील कंटेस्टंट असलेल्या कलाकारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पिस्ता धाकडच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं आहे. शोक व्यक्त करणाऱ्या कलाकारांमध्ये देवोलीन भट्टाचार्यजी, काम्या पंजाबी, हिमांशी खुराना, प्रिंस नरूला, युविका चौधरी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
काम्या पंजाबीने व्यक्त केलं दुःख
'बिग बॉस'च्या अनेक सीझनमध्ये दिसून आलेली अभिनेत्री काम्या पंजाबीने पिस्ता धाकडच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. काम्याने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "मी पिस्ताच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर सुन्न झाले. मला हे ऐकून विश्वासच बसला नाही. मी 'बिग बॉस'च्या अनेक सीझनमध्ये सहभागी झाले आहे. अशातच पिस्ताला मी नेहमीच भेटत होते आणि नेहमीच तिच्यासोबत फोनवर बोलणंही होत होतं."
काम्या पंजाबीने पुढे बोलताना सांगितलं की, "आता काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी फिल्मसिटीमध्ये 'बिग बॉस'च्या सेटवर गेले होते. तिथेच मला पिस्ता भेटली होती. अशातच मी तिथे 15-20 मिनिटांसाठी तिच्याशी गप्पा मारल्या. मला आता समजत नाहीये की, मी काय बोलू. मी तिला खरंच खूप मिस करिन."
महत्त्वाचं म्हणजे, पिस्ता धाकज एंडमॉल शाइन इंडियाच्या इतरही शोसाठी टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. ज्यामध्ये 'खतरो के खिलाडी' नावाच्या शोचाही समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या :