KL Rahul Half Century :  मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात के. एल. राहुलची खेळी भारतासाठी महत्वपूर्ण खेळी ठरली आहे. के. एल. राहुलने टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढून विजय मिळवून दिला. राहुलने 73 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि रविंद्र जडेजासोबत निर्णायक भागिदारी करून भारताला विजयापर्यंत पोहोचवले. राहुलने 91 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. यात त्याने सात चौकार आणि एक षटकार खेचला. गेल्या काही दिवसांपासून कठीण परिस्थितीतून जात असलेल्या राहुलच्या आजच्या खेळीचे जोरदार कौतुक केले जात आहे. 


के.एल. राहुल बऱ्याच दिवसांपासून फॉर्मात नाही. तरी देखील त्याला अनेक वेळा संधी देण्यात आली. त्यामुळे त्याच्यासह निवड समितीवर देखील जोरदार टीका झाली. परंतु, आज भारताचे सलामीचे सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर केएल राहुलने संपूर्ण मॅच आपल्या खांद्यावर घेत एका बाजूने कडवी झुंज दिली. त्याला कर्णधार हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी मोलाची साथ दिली. 


केएल राहुल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येही अपयशी ठरला. त्यामुळे त्याला उपकर्णधारपदावरून देखील हटवण्यात आले. माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील केएल राहुलवर टीका केली होती. "जेव्हा तुम्ही भारतात धावा करू शकत नाही, तेव्हा तुमच्यावर नक्कीच टीका होईल. यापूर्वीही अनेक खेळाडूंना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. खेळाडूंवर खूप दडपण असते आणि त्यांच्याकडे खूप लक्ष दिले जाते. कारण तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असल्याचे संघ व्यवस्थापनाला वाटते. तुमच्याबद्दल प्रशिक्षक आणि कर्णधाराचे मतही खूप महत्त्वाचे असते, असे गांगुली यांनी म्हटले होते. सोशल मीडियावरून देखील राहुलवर जोरदार टीका झाली आहे. परंतु, आजच्या महत्वपूर्ण सामन्यात केलेल्या धडाकेबाज खेळीने राहुलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  


ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. अवघ्या 39 धावांत भारताने आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी डाव सांभाळला. त्यांची जोडी जमली असे वाटत असतानाच हार्दिक पांड्या बाद झाला. त्यानंतर राहुल आणि रविंद्र जाडेजा या जोडीने नाबाद राहत भारताला विजय मिळवून दिला. राहुलने नाबाद 75 तर रविंद्र जाडेजाने नाबाद 45 धावांची खेळी केली. त्याशिवाय हार्दिक पांड्याने 25 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने भेदक मारा केला. स्टार्कने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. तर स्टॉयनिस याने दोन विकेट घेतल्या.  


महत्वाच्या बातम्या


सिराज-शामीची कमाल अन् राहुल-जडेजाची धमाल, ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने विजय