IND vs AUS, 1st ODI : सिराज आणि शामी यांच्या धारधार गोलंदाजीपुढे कांगारुंनी लोटांगण घातले होते. ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 188 धावांत संपुष्टात आला होता. पण प्रत्युत्तर दाखल भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली होती. पण केएल राहुलचे अर्धशतक आणि रविंद्र जाडेजाची संयमी खेळीच्या बळावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 189 धावांच्या आव्हान भारताने पाच विकेट्स शिल्लक ठेवत पार केले.
भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिराजने ट्रेविस हेड याला स्वस्तात बाद करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. पण स्मिथ आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभळला. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली होती. ही जोडी धोकादायक होतेय असे वाटत असतानाच हार्दिक पांड्याने स्मिथचा अडथळा दूर केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होते. मिचेल मार्श याने एक बाजू लावून धरली होती. पण जाडेजाने मार्श याला तंबूत पाठवत मोठा अडथळा दूर केला. मार्शने 81 धावांची खेळी केली. त्याशिवाय स्मिथ 22, लाबुशेन 15, जोश इंग्लिश 26, कॅमरुन ग्रीन 12, ग्लेन मॅक्सवेल 8, स्टॉयनिस 5 आणि सीन एबॉट 0 यांना मोठी खेळी करता आली नाही. परिणामी ऑस्ठ्रेलियाचा डाव 35 षटकात 188 धावांत संपुष्टात आला. भारताकडून सिराज आणि शामी यांनी धारधार गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. अवघ्या 39 धावांत भारताने आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी डाव सांभाळला. जोडी जमली असे वाटत असतानाच हार्दिक पांड्या बाद झाला. त्यानंतर राहुल आणि रविंद्र जाडेजा या जोडीने नाबाद राहात भारताला विजय मिळवून दिला. राहुलने नाबाद 75 तर रविंद्र जाडेजाने नाबाद 45 धावांची खेळी केली. त्याशिवाय हार्दिक पांड्याने 25 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने भेदक मारा केला. स्टार्कने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. तर स्टॉयनिस याने दोन विकेट घेतल्या.