लॉर्ड्स : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं त्याच्या वन डे कारकीर्दीतली आणि यंदाच्या विश्वचषकातली दुसरी हॅटट्रिक साजरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बोल्टनं अखेरच्या षटकातल्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेऊन हॅटट्रिकची नोंद केली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ट अकरावा खेळाडू ठरला आहे.


त्यानं आधी उस्मान ख्वाजा त्यानंतर मिचेल स्टार्क आणि मग जेसन बेहरेनडॉर्फला माघारी धाडलं. विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासातली ही अकरावी हॅटट्रिक ठरली. तर न्यूझीलंडकडून विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा बोल्ट हा पहिलाच गोलंदाज ठरला.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 243 धावांपर्यंत मजल मारली. ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकात उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क आणि जेसन बेहरनडॉर्फ यांना माघारी धाडत हॅटट्रीक केली.

2019 विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीकची नोंद करणारा बोल्ट दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी भारताच्या मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकामध्येच हॅटट्रीकची नोंद केली होती.

दरम्यान, प्रत्येक सामन्यात दमदार सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात न्यूझीलंड विरुद्ध मात्र चांगली झाली नाही. वार्नर, फिंच, स्मिथ, मॅक्सवेल झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती गंभीर झाली होती. मात्र उस्मान ख्वाजा आणि अलेक्स केरीने चांगली भागीदारी करत संघाला सुस्थितीत पोहोचविले.