पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संबंधांवर दोघांनीही चर्चा केली. या भेटीनंतर मॉरिसन यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर केला. सेल्फी शेअर करताना त्यांनी 'कितना अच्छा है मोदी' अर्थात 'मोदी किती चांगले आहेत' असे कॅप्शन दिले आहे.
याच ट्वीटला रिट्विट करताना मोदींनी ' मित्र, मी आपल्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील ऊर्जेविषयी विचार करत आहे' असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
दरम्यान आज मोदींनी इंडोनेशिया, ब्राझील, तुर्की, ऑस्ट्रेलिया,सिंगापूर आणि चिलीच्या नेत्यांसोबत वेगवेगळ्या बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी व्यापार, दहशतवाद, समुद्र सुरक्षा, आणि खेळ अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली.
जी-20 शिखर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी भारत-इंडोनेशियामधील संबंध घनिष्ट करण्याच्या दृष्टीने राष्ट्रपती जोकोवि (जोको विडोडो) यांच्याशी विस्तृत चर्चा केली. व्यापार,गुंतवणूक, अंतराळ क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासारख्या जागतिक नेत्यांच्या द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय बैठक केली होती. यामध्ये त्यांनी व्यापार, विकास आणि दहशतवाद या विषयावर चर्चा केली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद हा जगासाठी एक धोका आहे. दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे म्हटले होते. तसेच यावेळी मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावर जागतिक परिषदेचीही मागणी केली.