अकोला :  वर्गातील भांडणातून थेट एका विद्यार्थ्यानं दुसर्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केला आहे. दोन्ही विद्यार्थी अकोल्यातील गीतानगर भागातल्या सेंट एन्स शाळेचे विद्यार्थी आहेत. ज्याच्यावर हल्ला झाला तो विद्यार्थी अकोला जिल्ह्यातील पातूरचा रहिवाशी आहे.

वर्गात एका शुल्लक कारणावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेनंतर शाळा सुटल्यानंतर दोन्ही विद्यार्थी ऑटोने  घराकडे निघाले होते. पातूरकडे निघालेल्या विद्यार्थ्याला दुसरा विद्यार्थी गंगानगर भागात घेऊन गेला. तिथे त्याने पातूरचा रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यावर चाकूने पाच ते सहा वार केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

या घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थी घटनास्थळावरून पसार झाला आहे. दरमान, हल्ल्याच्या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याला नागरिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. सध्या जखमी विद्यार्थ्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि शाळेत चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

दरम्यान, इतका टोकाला जाणारा विद्यार्थ्यांमधील वाद नेमका आहे तरी कोणता? हल्ला झालेला विद्यार्थी हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यासोबत नेमका गंगानगर भागात गेला कसा? हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याजवळ चाकू आला तरी कसा? हल्ला करणारा विद्यार्थी एकटाच होता की त्यात आणखी काहीजण सहभागी आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.