लंडन : क्रिकेटच्या इतिहासात विश्वचषकातील एवढा रंगतदार सामना यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. बेन स्टोक्स आणि इंग्लंडचं नशीब चांगलं होतं, त्यामुळे संघाला अखेरच्या षटकात अतिशय मौल्यवान चार अतिरिक्त धावा मिळाल्या. यामुळे लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर न्यूझीलंडचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं.


या प्रकारावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाराजी व्यक्त केली. तर बॉलू चुकून आपल्या बॅटला लागल्याने, मी याबद्दल न्यूझीलंड संघाची माफी मागतो, असं बेन स्टोक्स म्हणाला.

इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत बेन स्टोक्सने धावसंख्या तीन चेंडूत नऊ धावा अशी आणली. चौथ्या चेंडूवर स्टोक्सने चेंडू मिडविकेट बाऊंड्रीवर टोलवला आणि दोन धावांसाठी धावला. क्रीझवर पोहोचण्यासाठी त्याने झेप घेतली. त्याचवेळी मार्टिन गप्टिलचा थ्रो त्याच्या बॅटला लागून चेंडू सीमारेषेच्या पार गेला. अशाप्रकारे स्टोक्स आणि इंग्लंडला एकूण सहा धावा मिळाल्या. आता दोन चेंडूंत तीन धावांची आवश्यकता होती.

सुपर ओव्हर आणि सुपर टायब्रेकरवरुन विम्बल्डन-आयसीसीमध्ये मजेशीर संवाद


इंग्लंडला मिळालेल्या या धावा नियमांनुसार अगदी योग्य होत्या. आयसीसीच्या नियमानुसार, जर चेंडू ओव्हर थ्रोवर सीमारेषेच्या पार गेला (मग तो चुकून बॅटला का लागलेला असेना) तर त्याआधी काढलेल्या धावांमध्ये चौकाराच्या चार धावा जोडल्या जातील.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यामुळे फारच नाराज झाला. सामना संपल्यावर तो म्हणाला की, "ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे की चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागला. ही गोष्ट अशावेळी घडली की सामन्याचं चित्रच पालटलं. यापुढे महत्त्वाच्या क्षणाला असं घडू नये, अशी आशा मी व्यक्त करतो." दरम्यान, शानदार कामगिरीमुळे विल्यमसनचा 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'च्या किताबाने गौरवण्यात आलं.

World Cup 2019 | क्रिकेटचा जन्मदाता देश पहिल्यांदाच विश्वविजेता, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विजयी

या प्रकाराबद्दल बेन स्टोक्सने न्यूझीलंडच्या संघाची माफीही मागितली. तो म्हणाला की, "अखेरच्या षटकात बॉल माझ्या बॅटला लागून सीमारेषेच्या पार गेला, तुम्ही हा विचारही केला नसाल. मी याबाबत केनची असंख्य वेळा माफी मागितली आहे. मला असं करायचं नव्हतं."

सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा विजय
न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 16 धावांचं लक्ष्य होतं. पण न्यूझीलंडला 15 धावाच करता आल्या आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र सुपीरिअर बाऊंड्री काऊंट अर्थात सामन्यातील सर्वाधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडने सामना जिंकत, विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंडने या सामन्यात 24 तर न्यूझीलंडने 16 चौकार लगावले होते.