सिडनी : ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारतीय महिलांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. सिडनीत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या क्रमवारीत नंबर वन ठरलेली शेफाली वर्मा आणि इंग्लंडची सोफी एकलस्टन यांच्यातलं द्वंद्वं हे या सामन्याचं मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे. टीम इंडिया साखळी सामन्यांमध्ये चार सामने जिंकून 8 गुणांसह अव्वल स्थानी आहे.


इंग्लंडची ही कामगिरी लक्षात घेता शेफाली वर्मासमोरचं आव्हान खूपच मोठं आहे. तिला स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिक्सची साथ मिळाल्याशिवाय बलाढ्य इंग्लंडला हरवणं कठीण आहे. त्यात या लढाई इंग्लंडच्या सोफी एकलस्टनला खेळण्याचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत सोफी एकलस्टन नंबर वन झाली आहे. त्यामुळे पर्यायाने सोफी एकलस्टनला भिडण्याची जबाबदारी बॅट्समन नंबर वन शेफाली वर्मावर आहे. शेफालीनं ते द्वंद्व जिंकलं तर इंग्लंडची लढाई जिंकून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची फायनल गाठणं भारतीय महिलांना सोपं जाईल.


IND vs SL, ICC Women's T20 WC | टीम इंडियाचा सलग चौथा विजय, श्रीलंकेचा सात विकेट्सने धुव्वा


ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय महिलांनी आजवर कधीही फायनलमध्ये धडक मारलेली नाही. फायनलच्या या उंबरठ्यावर भारतासमोर लागोपाठ दुसऱ्यांदा इंग्लंडचं आव्हान आहे. 2018 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात इंग्लंडनं भारताचं आव्हान उपांत्य फेरीतंच संपुष्टात आणलं होतं. पण त्याआधीही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताला इंग्लंडला कधीच हरवता आलेलं नाही. इंग्लंडचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला भारताविरुद्धचा रेकॉर्ड हा 5-0 असा आहे.


सेमीफायनलवर पावसाचं सावट


आजच्या सेमीफायनलच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. आज या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसामुळे सामना रद्द होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची शक्यता आहे.


Women's T20 World Cup | भारतीय संघाची विजयी हॅट्रीक; सेमीफायनमध्ये एन्ट्री


महिला भारतीय संघाची 'लेडी सेहवाग'


भारताची धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्माने ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या फलंदाजांच्या क्रमवारीत नंबर वनवर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियातल्या महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना इंग्लंडशी होत आहे. या सामन्याच्या आदल्या दिवशीच शेफालीनं आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं. या विश्वचषकात ती सातत्यानं धावांचा रतीब घातला. त्यामुळे साहजिकच इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शेफाली वर्माकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्यायत. ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात शेफाली वर्मानं आपल्या टनाटन टोलेबाजीचा असा काय जलवा दाखवलाय की, लोकांनी तिचं 'लेडी सहवाग' असं बारसं करून टाकलं आहे. भारताची ही लेडी सहवाग आज खऱ्या अर्थानं त्या उपाधीला जागली. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या आयसीसी क्रमवारीत ती आता नंबर वन फलंदाज झालीय.


भारताची माजी कर्णधार मिताली राजनंतर ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या क्रमवारीत नंबर वन होणारी शेफाली वर्मा ही दुसरी भारतीय महिला आहे. पण तिच्यासाठी ही कामगिरी सोपी अजिबात नव्हती. न्यूझीलंडची सुझी बेट्स ऑक्टोबर 2018 पासून, म्हणजे गेली दीड वर्षे नंबर वनवर ठाण मांडून बसली होती. त्याच सुझी बेट्सला शेफाली वर्मानं अकरा रेटिंग गुणांनी पिछाडीवर टाकलं.


ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या विश्वचषकात शेफालीनं आपल्या बॅटचा असा काय जलवा दाखवलाय की, अवघ्या चार सामन्यांमध्ये तिच्या नावावर 161 च्या स्ट्राईक रेटनं 161 धावांचं भरघोस पीक उभं राहिलंय. शेफालीचं अवघं सोळा वर्षांचं वय लक्षात घेतलं तर तिच्या कामगिरीचं आणखी कौतुक वाटतं. विशेष म्हणजे स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्यासारख्या दोन बड्या फलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावत नसताना, भारतीय महिलांना विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं ते एकट्या शेफाली वर्मानं. पण याच कामगिरीने आता तिच्याविषयीच्या अपेक्षा आणखी उंचावल्यात. ही लेडी सहवाग भारतीय महिलांना ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट मिळवून देईल का, असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडलाय.


संभाव्य संघ


भारत : हरनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शिखा पांडे, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, जेम्मिह रोड्रिगेज, पूजा वस्त्राकर, तान्या भाटिया, राधा यादव, हरलीन देओल, अरुंद्धती रॉय, शेफाली वर्मा, रिचा घोष.


इंग्लंड : हीटर नाईट (कर्णधार), आन्या श्रबसोल, डॅनियल व्याट, टॅमी ब्यूमोंट, कॅथरीन ब्रंट, जॉर्जिया एल्विस, एमी एलेन जोन्स, नटाली शिवर, लॉरेन विनफील्ड, केट क्रॉस, फ्रँक विल्सन, सोफी एक्लेस्टोन, साराह ग्लेन, फ्रेया डेविस, मॅडी विलियर्स.


सबंधित बातम्या :