ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या ख्राईस्टचर्च कसोटीत भारताचा सात विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारताला 2-0 असा क्लीनस्वीप दिला. ख्राईस्टचर्चच्या हेग्ले ओवर मैदानात खेळवण्यात आलेला हा सामना अवघ्या तिसऱ्या दिवशीच संपला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 132 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. किवी संघाने हे लक्ष्य सात विकेट्स राखून पार केलं. यात सलामीवीर टॉम लॅथम (52 धावा) आणि टॉम ब्लण्डेल (55 धावा) यांनी महत्त्वपूर्व योगदान दिलं.


याआधी यजमान संघाने भारताला पहिल्या कसोटी सामन्यात दहा विकेट्सनी पराभूत केलं होतं. अशाप्रकारे कसोटी अव्वल क्रमांकावर असलेल्या भारताला न्यूझीलंडने मायदेशात 2-0 असं पराभूत केलं. या दौऱ्यातील ट्वेन्टी 20 मालिका भारताने 5-0 अशी जिंकली होती. मात्र त्यानंतर वनडे सामन्यात मात्र 0-3 असा व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. आता कसोटी मालिकेतही भारताचा 0-2 असा लाजिरवाणा पराभव झाला.


ख्राईस्टचर्चमध्ये खेळलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. पहिल्या डावात भारताचा डाव 242 धावांवर आटोपला. यानंतर न्यूझीलंडचा पहिल्या डावात 235 धावांवर गुंडाळून भारताने दुसऱ्या डावात नाममात्र सात धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडला 235 धावांमध्येच गुंडाळल्यावर भारतीय संघ दुसऱ्या डावात मोठी मजल मारेल अशी अपेक्षा होती. किवी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारताला केवळ 124 धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर केवळ 132 धावांचं आव्हान होतं.


यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सलामीवीर टॉम लॅथम आणि टॉम ब्लण्डेल यांनी दमदार सुरुवात केली. दोघांच्या अर्धशतकांनी न्यूझीलंडला विजयानजीक पोहोचवलं. त्यानंतर उमेश यादवने टॉम लॅथमला तर जसप्रीत बुमराने टॉम ब्लण्डेल आणि कर्णधार केन विल्यमसनला माघारी धाडलं. मात्र तोपर्यंत भारताच्या हातातून वेळ निघून गेली होती.