Sri Lanka Cricket Board : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कठोर कारवाई करत श्रीलंका क्रिकेट (SLC) तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. श्रीलंकेच्या संसदेने गुरुवारी एकमताने ठराव मंजूर केल्यानंतर आयसीसीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या ठरावात श्रीलंका क्रिकेट बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली, ज्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. आयसीसीने असा निष्कर्ष काढला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे गंभीर उल्लंघन करत आहे. त्यांना त्यांचे सर्व व्यवहार स्वतंत्रपणे हाताळावे लागतात. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कारभार किंवा प्रशासनात सरकारी हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे.
श्रीलंकेच्या फ्युचर टूर प्रोग्रामवर परिणाम होण्याची शक्यता
आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'निलंबनाच्या अटी आयसीसी बोर्ड योग्य वेळी ठरवेल. 21 नोव्हेंबर रोजी आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे, त्यानंतर पुढील पावले उचलली जातील. श्रीलंका पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे.
जोपर्यंत ICC श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवत नाही तोपर्यंत श्रीलंकेला ICC च्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. मात्र, चांगली बाब म्हणजे क्रिकेट विश्वचषकातील श्रीलंका संघाचे सर्व सामने आटोपल्यानंतर आयसीसीने ही कारवाई केली आहे, त्यामुळे विश्वचषकाच्या वेळापत्रकावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, बंदीमुळे श्रीलंकेच्या फ्युचर टूर प्रोग्रामवर (एफटीपी) परिणाम होऊ शकतो.
सरकारकडून क्रिकेट बोर्डात ढवळाढवळ
श्रीलंका सरकारने 6 ऑक्टोबर रोजी श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) विसर्जित केले होते. श्रीलंकेच्या चाहत्यांनी क्रिकेट बोर्डाच्या मुख्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. श्रीलंका सरकारने बोर्ड बरखास्त केल्यानंतर माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम समिती स्थापन करण्यात आली. मात्र, नंतर न्यायालयाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व बहाल केले. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि त्यांना नऊपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले. श्रीलंका चार गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे श्रीलंकेसाठी खूप कठीण दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या