मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची कसोटीत धडाकेबाज द्विशतक ठोकणारा चेतेश्वर पुजारा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पुजारा दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
पुजाराने आतापर्यंत गाठलेलं हे त्याचं सर्वोच्च स्थान आहे. पुजारा 861 गुणांसह फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (941) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुजारा दुसरा, ज्यो रुट (848) तिसरा, विराट कोहली (826) चौथ्या आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन (823) पाचव्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजीत जाडेजा अव्वल
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने, आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत जाडेजाने भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच जाडेजा सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे.
आयसीसीच्या सध्याच्या रँकिंगमध्ये जाडेजाने भारताच्याच आर अश्विनला मागे टाकलं. यापूर्वी अश्विन-जाडेजा कसोटी गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान होते.
मात्र आता 899 गुणांसह जाडेजाने पहिल्या नंबर मिळवला आहे.
जाडेजानंतर अश्विन 862 गुणांसह दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तर त्यानंतर श्रीलंकेचा रंगना हेरथ (854) तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड (842) चौथ्या आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन (810) पाचव्या क्रमांकावर आहे.