लंडन : विश्वचषकाच्या रणांगणात डार्क हॉर्स असलेल्या बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर गेलेल्या अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. पण सामना सुरु होण्या आधीच अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार गुलबाद्दीन नाईब याने बांगलादेश संघाला इशारा दिला आहे. गुलबाद्दीन नाईबने सामाना आधीच्या पत्रकार परिषदेत 'हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे' असा इशाराच बांग्लादेश टीमला दिला आहे.


यावरुनच अफगाणिस्तान मागचे सगळे पराभव विसरुन पूर्ण ताकदीने सामन्यता उतरणार आहे. विश्वचषकाच्या सामन्यात लागोपाठ सहा सामने हरल्यानंतर अफगाणिस्तान आज आपला सातवा सामना खेळणार आहे. 2019च्या विश्वचषकात अफगाणिस्ताना क्रिकेट संघाकडे गमावण्यासारखे काहीही राहिलेलं नाही. पण अशा परिस्थितीत अफगाणिस्तान संघ सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा खेळ खराब करु शकतो.


याआधी शाकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशनं दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारख्या मातब्बर संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं तीनशेपार मजल मारली होती.

विश्वचषकाच्या गुणतालिकेत बांगलादेश पाच गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे बांगलादेशच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही जिवंत आहेत. दुसरीकडे सहाही सामन्यात पराभव स्वीकारलेला अफगाणिस्तानचा संघ पहिल्या विजयाच्या प्रयत्नात असेल.