India vs Spain Hockey World Cup 2023  : भारतीय हॉकी संघाने (Team India) हॉकी विश्वचषकाची (Hockey World Cup 2023) सुरुवात विजयाने केली आहे. भारताने सलामीच्या सामन्यात स्पेन संघाविरुद्ध (India vs Spain) 2-0 असा विजय मिळवला आहे. यंदा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असताना भारताने विजयाने स्पर्धेची सुरुवात केल्याने भारतीय संघाचं कौतुक होत असून भारतीय हॉकी चाहतेही सुखावले आहेत. सामन्यात भारतासाठी अमित रोहिदास (Amit Rohitdas) आणि हार्दिक सिंग (Hardik Singh) यांनी गोल केला.






सामन्याचा लेखा-जोखा


सामन्यात सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी उत्तम खेळाचं दर्शन घडवलं. एकामागून एक आक्रमणं स्पेनच्या गोलपोस्टवर सुरु ठेवली. सर्वात आधी 12 व्या मिनिटांला भारताला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीचं गोलमध्ये रुपांतर करत 13 व्या मिनिटाला अमित रोहिदास याने भारतासाठी पहिला गोल केला. 1-0 अशी आघाडी घेतल्यावर भारताने आणखी दमदार खेळ सुरु केला.भारताच्या किपरने बऱ्याच चांगल्या सेव्ह केल्याने स्पेनची आक्रमणं भारतानं यशस्वीरित्या परतावून लावली. त्यानंतर बरोबर 26 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने एकहाती दमदार खेळ करत एक अप्रतिम गोल केला. ज्यानंतर हाल्फ टाईमची शिट्टी वाजली. हाल्फ टाईमवेळी भारत 2-0 अशा चांगल्या आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या हाल्फमध्येही दोन्ही संघानी चांगला खेळ केला. पण एकही गोल दोघांना करता आला नाही. ज्यामुळे अखेर 2-0 अशा फरकाच्या आघाडीनं भारतानं सामना नावावर केला.  


भारताची विजयी सुरुवात


भारत असणाऱ्या D गटात भारताने आज विजय मिळवत चांगली आघाडी घेतली आहे. या गटात भारतासह  इंग्लंड, स्पेन आणि वेल्स असे दमदार संघ आहेत. भारताशिवाय या गटातील इंग्लंड आणि वेल्स यांचाही आज सामना झाला ज्यात इंग्लंडने 5-0 असा दमदार विजय मिळवला.  भारताचा यानंतरचा सामना रविवारी अर्थात 15 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध असणार आहे. आजप्रमाणेच सायंकाळी 7 वाजता हा सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


हे देखील वाचा