Kolhapur Crime : कोल्हापूर शहराच्या हद्दीवर असलेल्या ज्या पाचगावने खूनाच्या बदल्यात खून अशी मालिकाच पाहिली, जिल्ह्यातील दोन मातब्बर राजकीय नेत्यांच्या गटांच्या जीवघेण्या ईर्ष्येतून राडा पाहिला, टँकरचे राजकारण पाहिले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा गुंडगिरी फोफावू लागली आहे. यामुळे या भुरट्यांना हवेत उडू न देता वेळीच नांगी ठेचण्याची गरज आहे. कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून टोळीयुद्ध चांगलेच फोफावले आहे. त्यामुळे पाचगावात रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल, तर कोल्हापूर पोलिसांनी (kolhapur police) वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.


मंगळवारी रात्री पाचगाव हद्दीतील (Pachgaon Crime) गिरगावच्या खडीला असणाऱ्या हाॅटेलमध्ये कुख्यात डीजेचा मुलगा सुजित जाधव आणि त्याच्या साथीदारांनी नंगानाच करत हाॅटेल मालकासह त्यांच्या मुलाला मारहाण केली. हाॅटेल कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. या गंभीर प्रकारानंतर हाॅटेल मालक विक्रमसिंह प्रभाकर क्षत्रिय (रा. रामानंदनगर, कोल्हापूर) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्याने मारहाण करतानाच पाचगाव आमच्या मालकीचं आहे, हाॅटेल कसं चालवतोस तेच बघतो, रोज येऊन तोडफोड करणार इतक्यापर्यंत जाऊन धमकीही दिली. यापूर्वीही एक दोनवेळा डीजेच्या मुलाकडून विक्रमसिंह यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. डीजेला अशोक पाटील खून प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. 


संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या पाचगावमधील राजकीय वर्चस्ववादातून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मारुती पाटील व धनाजी तानाजी गाडगीळ यांच्या खून खटल्यात दोन्हीही गटातील11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे.13 फेब्रुवारी 2013 रोजी भरदिवसा न्यू महाद्वार रोडवर अ‍ॅक्सिस बँकेच्या दारात अशोक पाटील हा सिगारेट ओढत मोबाईलवर बोलत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चौघा तरुणांपैकी दोघांनी पाटील यांच्या डोक्यात गोळ्या झाडून खून केला होता. या खुनामुळे सुडाने पेटलेल्या पाटील गटाने खुनाचा बदला खून म्हणून आरोपी दिलीप जाधवचा मेहुणा धनाजी गाडगीळ याचा 13 डिसेंबर 2013 रोजी पाचगावमध्ये सपासप वार करून खून केला होता.


त्यामुळे खूनाच्या बदल्यात खून पाडल्यानंतर पाचगाव गेल्या काही वर्षांपासून शांत आहे. मात्र, ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना? अशी शंका या उर्मट भाषेतून येऊ लागली आहे. पाचगाव हे अत्यंत संवेदनशील म्हणून पोलिसांच्या कायमच रडारवर आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाचगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गावची निवडणूक शांततेत पार पडली होती. त्यामुळे शांतता अबाधित राहण्यासाठी या प्रवृतीला वेळीच आवर घालण्याची गरज आहे. 


पाचगावचा प्रचंड वेगाने विस्तार


कोल्हापूरच्या तीन दिशांच्या तुलनेत दक्षिणेकडे गेल्या काही दिवसांपासून वेगाने विस्तार होत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दीवर असलेल्या पाचगावचा अति प्रचंड वेगाने विकास झाला आहे. पाचगावच्या शेवटच्या टोकापासून ते गिरगावच्या हद्दीपर्यंत असलेली मोकळी जागाही भरून चालली आहे. त्यामुळे जमिनींच्या व्यवहारातून अनेकजण विनासायास गब्बर होऊन गेले आहेत. त्यामुळे सावकारी करणारे सुद्धा तयार झाले आहेत. सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत.   


पाचगावमध्ये आज शांतता दिसत असली, तरी पाचगावमध्ये वर्चस्वासाठी आसूसलेल्यांकडून सातत्याने बॅनरबाजी होत असते. त्यामुळे याकडे पोलिसांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे या टोळ्या सक्रीय होण्यापूर्वीच यांचा नायनाट करण्याची गरज आहे. पाचगावमधील व्यावसायिक हाॅटेलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर चांगलीच दहशत पसरली आहे. पाचगाव आणि कंदलगावच्या परिसरात अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. त्यामुळे या भागातील शांतता आणि गावातील टोळीयुद्ध पुन्हा भडकू न देणे हे पोलिसांनी आव्हान म्हणून स्वीकारावे लागेल. अनेक मालिकांचे शूटिंगही या भागात होत असते.   


कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ; गुन्ह्यांची उकल होण्यातही निराशा


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून हे सिद्ध झाले आहे. 2022 मध्ये सशस्त्र दरोड्याच्या 110 प्रकरणांची नोंद झाली. तथापि, आतापर्यंत फक्त 66 प्रकरणांचा उलघडा झाला आहे. दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा शोध घेण्याचे प्रमाण केवळ 29 टक्के आहे. खून, खुनाचे प्रयत्न, सरकारी अधिकाऱ्यांवरील हल्ले इत्यादी प्रमुख गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा शोध 100 टक्के आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या बाबतीत पकडण्याचे प्रमाण 99 टक्के आहे. महिलांवरील 563 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर 2021मध्ये 528 गुन्हे नोंदवले गेले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या