नवी दिल्ली : दिग्गज हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे बलबीर सिंह सीनियर यांना मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटका आला. त्यामुळे सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. बलबीर सीनिअर यांना मोहालीच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. 96 वर्षीय दिग्गज हॉकी प्लेअर बलबीर सीनिअर यांचा नातू कबीर सिंह भोमिया त्यांच्या प्रकृतीबाबत सांगताना म्हणाले की, 'आजोबांना (मंगळवारी) सकाळी हार्ट अटॅक आला. सध्या त्यांना मेडिकल आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. शुक्रवार आठ मे रोजी त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती, त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती. परंतु, हार्ट अटॅकमुळे त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे.'


कबीर सिंह भोमिया पुढे बोलताना म्हणाले की, 'डॉक्टर्स पुढिल 24 ते 48 तासांपर्यंत सतत त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवणार असून त्यानंतरच ते त्यांच्या प्रकृतीबाबत काही माहिती देणार आहेत. सध्या त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे.'



पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी बलबीर सीनिअर लवकर बरे व्हाहे यासाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह बलबीर सीनिअर यांना टॅग करत म्हणाले की, 'बलबीर यांना हार्ट अटॅक आल्याचं ऐकूण अत्यंत दुःख झालं असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तुम्ही लवकर बरे व्हाल यासाठी मी प्रार्थना करतो.'


बलबीर सीनियर यांना शुक्रवारी प्रकृती खालावल्यामुळे सेक्टर-36 स्थित येथील त्यांच्या घराच्या जवळ असणाऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते आपली मुलगी सुशबीर आणि नातू कबीर यांच्यासोबत राहत असतं. बलबीर सीनियर यांना गुरुवारी रात्री ताप आला. त्यांच्या कुटुंबाने त्यांना घरातच 'स्पंज बाथ' दिला. परंतु, त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.


बलबीर सीनियर यांना रूग्णालयात 108 दिवस घालवल्यानंतर गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पीजीआयएमईआर मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. या रूग्णालयात त्यांच्यावर न्युमोनियासाठी उपचार केले जात होते. दरम्यान, बलबीर सिंह सीनिअर त्यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्स विरोधात 6-1 ने भारताने विजय मिळवला होता. त्या सामन्यात त्यांनी पाच गोल केले असून त्यांच्या नावावर अद्याप हा रेकॉर्ड आहे. 1975 च्या विश्वकप स्पर्धेत विजयी झालेल्या भारतीय हॉकी टीमचे ते मॅनेजर होते.


संबंधित बातम्या : 


दिग्गज फुटबॉलर चुन्नी गोस्वामी यांचं निधन; वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास


Olympic 2020 | ... तर ऑलिम्पिक रद्द होणार; टोकियो ऑलिम्पिक कमिटीचा इशारा


Coronavirus | IPL 2020 रद्द झाल्यास मोठं नुकसान, पाच मोठे फटके कोणते?