Lionel Messi : जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार लिओनल मेस्सीचा (Lionel Messi) आज वाढदिवस. 35 वर्षीय मेस्सी आज जरी फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट असला तरी त्याचा इथवरचा प्रवास तितकाच खडतर होता. अवघ्या 10 व्या वर्षी एका गंभीर आजाराने ग्रासल्यानंतर त्याच्यावर मात करत आज जगातील अव्वल फुटबॉलर झालेल्या मेस्सीची कहानी खरचं अगदी प्रेरणादायी आहे. सध्या पॅरिस सेंट जर्मन (PSG) क्लबमध्ये खेळणारा मेस्सी अजूनही दमदार कामगिरी करत आहे. तर त्याच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर फिरवू...


लिओनल ज्याला लिओही म्हटलं जातं, त्याचा जन्म 24 जून, 1987 रोजी अर्जेंटिनाच्या रोजारियो येथे झाला. आई-वडिल दोघेही नोकरी करत असल्याने मेस्सी अधिक काळ त्याची आजी सेलियासोबतच असतं. अगदी लहान वयापासून फुटबॉलची आवड असणाऱ्या मेस्सीच्या ट्रेनिंगसाठी त्याच्या सोबत त्याची आजीच असतं. 4 वर्षाचा असताना वडिलांच्या प्रशिक्षणाखालीच मेस्सीने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. मग 6 वर्षाच्या वयात मेस्सीने रोजारियो येथील न्यू-ओल्ड बॉईस क्लब जॉईन केला. पण काही वर्षातच अवघ्या वयाच्या 10 व्या वर्षी मेस्सीला 'ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी' या गंभीर आजारानं ग्रासलं.


बार्सिलोना संघ आता मदतीला धावून...


मेस्सीला झालेल्या या आजारात व्यक्तीची शाररिक वाढ खुंटते. त्यात या आजाराच्या उपचाराचा खर्चही भरपूर असल्याने मेस्सीची फॅमिली चिंतेत पडली. काही महिने खर्च त्यांना उचलता आला, पण नंतर मात्र सर्व आवाक्याबाहेर जाऊ लागलं. पण त्याच काळात स्पेनमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब बार्सिलोनाच्या (Barcelona) व्यवस्थापकांना मेस्सीच्या खेळाबाबत कळालं. त्यांनी लगेचच मेस्सीच्या फॅमिलीशी कॉन्टेक्ट करत त्याचा संपूर्ण आजाराचा खर्च उचलण्याचं मान्य करत त्याला करारबद्ध केलं. एका साध्या टिशू-पेपरवर मेस्सीनं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. ज्यानंतर मात्र मेस्सीने आपल्या अद्भुत खेळाने संघाला आणि स्वत:ला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. पुढील बरीच वर्षे मेस्सीने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर बार्सिलोना संघाला अनेक चषक मिळवून दिले. पण 17 वर्षानंतर ऑगस्ट, 2021 मध्ये मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील करार पुढे वाढू शकला नाही आणि दोघेही वेगळे झाले.


यंदा पटकावला सातवा 'बलॉन डी'ऑर'


मेस्सीसह सध्या फुटबॉल जगतातील आणखी एक स्टार खेळाडू म्हणजे पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तायानो रोनाल्डो. रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यात कायम तुलना होत असते, पण दोघांचीही पद्धत वेगवेगळी असल्याने दोघेही आपआपल्या ठिकाणी अव्वल आहेत. पण यंदा मेस्सीने रोनाल्डो आणि बायर्न म्यूनिखचा स्टार रॉबर्ट लेवानडॉस्कीला मागे टाकत फुटबॉल जगतातील ऑस्कर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही असा बलॉन डी ऑर हा खिताब मिळवला. तब्बल सातव्यांदा त्याने हा मान मिळवला. मेस्सीनं 2009, 2010, 2011, 2012, 2015 आणि 2019 मध्ये 'बलॉन डी'ऑर अवॉर्ड जिंकला होता. मेस्सीनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोनं सर्वाधिक वेळा हा पुरस्कार आपल्या नावे केलं आहे. रोनाल्डोनं 2008, 2013, 2014, 2016, 2017 मध्ये 'बलॉन डी'ऑर आपल्या नावे केला आहे. 


विश्वचषक जिंकणं आजही स्वप्न


आता फ्रान्स लीगमधील प्रसिद्ध क्लब पॅरिस सेंट जर्मनमध्ये खेळणारा मेस्सी आजही तितकाच दमदार खेळ करत आहे. फुटबॉल जगतातील मानाचा बलॉन डी'ऑर हा खिताब मेस्सीने सर्वाधिक 7 वेळा मिळवला आहे. पण असं असलं तरी आजही अर्जेंटिना देशाला विश्वचषक जिंकवूण देण्याची त्याची इच्छा अपूर्ण आहे. त्यात यंदाचा 2022 फिफा विश्वचषक हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असू शकतो, त्याची निवृत्ती जवळ आल्याने हा अखेरचा विश्वचषक जिंकण्यासाठी तो सर्व प्रयत्न करेल हे नक्की....