कोल्हापूर: गुवाहाटी येथे पार पडलेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत (National Para Swimming Championships, 2022) महाराष्ट्राने 428 गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया (Riya Patil) सचिन पाटील हिने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह बेस्ट स्विमरचा खिताब पटकावला.  यावेळी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने या वर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटीलचा सत्कार करण्यात आला.


आसाममधील गुवाहाटी शहरातील डॉ. झाकीर हुसेन अँकवेटिक कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 25 राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच देशभरातून एकूण 450 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये  महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे 55 खेळाडूंनी सहभाग घेऊन या स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळवलं. या पूर्ण स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघांने 428 गुण मिळवून चॅम्पियनशिप ट्रॉफी प्राप्त केली.


महाराष्ट्राचा ऑलिम्पिक खेळाडू सुयश जाधव तसेच स्वप्निल पाटील, दीपक पाटील यांनी या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केली. मुलींमध्ये कांचन चौधरी, वैष्णवी जगताप, शश्रुती नाकाडे, सिद्धी दळवी, रोशनी पात्रा, तृप्ती, नाशिकच्या सिद्धी आणि गौरी यांनी सुवर्णपदकाची परंपरा कायम ठेवली. 


रिया पाटीलचे सुवर्णयश


या स्पर्धेत सब ज्युनिअर गर्ल्समध्ये कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील हिने सुवर्ण कामगिरी केली. रिया पाटील ही या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू होती. तिने 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये 4 मिनीटे 12 सेकंदाची कामगिरी नोंदवली. तर 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये 1 मिनिटे 57 सेकंदाची कामगिरी नोंदवली. या दोन्ही प्रकारात रियाने नव्या रेकॉर्डसह सुवर्णपदक पटकावलं. तसेच रियाने 50 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत रिया पाटील हिला सर्वोत्कृष्ट  खेळाडूची ट्रॉफी देण्यात आली. 


या स्पर्धेमध्ये  पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया च्या वतीने यावर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मिडले रिले, फ्री स्टाईल रिले या दोन्ही स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी सुवर्ण आणि रोप्य पदक प्राप्त केले. या दोन्ही स्पर्धा खूप अटीतटीच्या झाल्या. महाराष्ट्राच्या संघाने अव्वल गुण मिळवताच पूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दणाणलं. 


महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर नाले आणि चेअरमन श्री. राजाराम घागे, प्रशिक्षक अमर पाटील तसेच टीम मॅनेजर अर्चना जोशी, तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघाने हे यश मिळवलं.