मुंबई : एकाच शहराच्या रहिवासी आणि एकाच प्रशिक्षकाच्या शिष्या... मात्र फुलराणी सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंनी स्वतंत्र सराव करण्याला पसंती दिली आहे.
सायना आणि सिंधू या दोघीही प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या हैदराबादमधल्या दोन वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये सराव करत आहेत. एकमेकींच्या रणनीतीची किंवा एकमेकींच्या भात्यातल्या नव्या अस्त्रांची दुसरीला कल्पना येऊ नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या दोघींमध्ये महिला एकेरीची फायनल झाली होती. त्यात सायनानं सिंधूवर मात करुन सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर सिंधूनं एक नवा विचार मांडून गोपीचंद यांच्या जुन्या अकॅडमीत सराव सुरु ठेवला आहे. सायना नेहवालनं मात्र नव्या अकॅडमीतल्या सुविधांचा वापर करायला सुरुवात केली आहे.
गोपीचंद यांना आपला वेळ दोन अकॅडमीमध्ये विभागून द्यावा लागत आहे. परंतु आपली काहीही हरकत नसल्याचं ते म्हणतात. दोघीही जणी स्वतंत्र सराव करण्यात कम्फर्टेबल असल्याचं गोपीचंद यांनी सांगितलं.