ठाणे : ठाणे खंडणीविरोधी पथकाने उघड केलेल्या आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खाननंतर आणखी काही सेलिब्रेटींची नावं समोर येत आहेत. दिग्दर्शक, अभिनेता साजिद खानही बेटिंग प्रकरणात अडकण्याची चिन्हं आहेत.
सात वर्षांपूर्वी साजिद खानने आपल्या माध्यमातून क्रिकेटवर बेटिंग केल्याची माहिती अटकेत असलेला बुकी सोनू जालान याने दिली आहे. त्यामुळे बेटिंगचं बॉलिवूड कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे.
आयपीएल बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून अटकेत असलेला बुकी सोनू जालान याची कसून चौकशी सुरु आहे. सोनू जालानने साजिदची माहिती पोलिसांना दिल्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणात साजिद खानला लवकरच चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, सोनू जालान याला ज्या होंडा सिटी गाडीतून अटक करण्यात आली होती, तिचा मालक असलेल्या समीर बुद्धा याची आज ठाणे खंडणीविरोधी पथकानं तीन तास कसून चौकशी केली. यावेळी आपला आयपीएल बेटिंगशी काहीही संबंध नसल्याचा दावा समीरने केला.
समीर याचा भाऊ सोहेल बुद्धा मुंबई पोलिसात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून तो सोनू जालान याचा मास्टरमाईंड मानला जातो. त्याच्याच माध्यमातून सोनूची समीरशी ओळख झाली आणि त्यांनी 2015 साली ऑटो स्पेअरपार्ट्सची फॅक्टरी सुरु केली. यावेळी सोनू आणि समीरने एक होंडा सिटी गाडीही विकत घेतली होती.
कालांतराने व्यवसाय बंद पडल्यावर ही गाडी सोनूने घेतली. मात्र ती अजूनही समीर बुद्धा याच्याच नावावर असून याच गाडीतून सोनू जालानला अटक करण्यात आल्यानं पोलिसांनी समीर याची चौकशी केली. तर उद्या या प्रकरणात चित्रपट निर्माता पराग संघवी याची ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून चौकशी केली जाणार आहे.
कोण आहे साजिद खान?
1995 मध्ये 'मै भी डिटेक्टिव्ह' या मालिकेच्या सूत्रसंचालनापासून साजिद खानची कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर इक्के पे इक्का, कहने में क्या हर्ज है, साजिद नं. 1, सुपर सेल यासारख्या अनेक कार्यक्रमांचं अँकरिंग त्याने केलं. झूठ बोले कौआ काटे चित्रपटातही त्याने भूमिका केली होती. नच बलिए, इंडियाज् गॉट टॅलेंट सारख्या रिअॅलिटी शोजचं परीक्षणही साजिदने केलं आहे.
2006 मध्ये डरना जरुरी है चित्रपटातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. हे बेबी, हाऊसफुल सीरिज, हिम्मतवाला, हमशकल्स अशा चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलं आहे.
कोरिओग्राफर फराह खानचा साजिद भाऊ आहे.