लोढा समितीच्या शिफारशीनंतर सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पदावरुन हटवलं आहे. त्यानंतर या प्रकरणावर सुनील गावसकर यांनी आपलं मत व्यक्त केलं.
बीसीसीआयकडे खूप काही करण्याची क्षमता असून बीसीसीआयची भूमिका देखील मोठी आहे. त्यामुळे या पदावर सौरव गांगुली हे नाव नेहमी आपल्या मनात येतं, असं त्यांनी सांगितलं. त्यांना बीसीसीआय अध्यक्षपदासाठी पात्र उमेदवार कोण, असं विचारल्यानंतर हे उत्तर दिलं.
गावसकर यांनी 1999-2000 सालचं उदाहरणही दिलं. त्या काळात जेव्हा टीमवर मॅच फिक्सिंगचं संकट होतं तेव्हा गांगुलीकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आणि त्याने सर्व काही बदलून दाखवलं, असं गावसकर म्हणाले.
गांगुलीने भारतीय संघात 113 कसोटी सामने आणि 311 वन डे सामने खेळले असून कसोटीत 7212, तर वन डेमध्ये 11, 363 धावा केल्या आहेत.
बीसीसीआयच्या संपूर्ण घटनाक्रमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेलाय. त्यामुळे बीसीसीआयला आता नव्या चेहऱ्याची गरज आहे, असं गावसकर म्हणाले.