नवी दिल्ली : घरातील जुनी वस्तू विकून नवी घेण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन तुम्हाला मदत करणार आहे. कारण अमेझॉनने आता भारतात 'पिक-पॅक अँड पे' ही सेवा भारतात सुरु केली आहे. सध्या ही सेवा केवळ बंगळुरुमध्ये सुरु असून लवकरच काही मोठ्या शहरांमध्ये सुरु होऊ शकते.

अमेझॉनने ऑगस्टमध्ये जुनी पुस्तकं विकण्याची सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर आता इतर वस्तूही विकता येणार आहेत. सध्या जुना मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, गॅजेट, व्हिडिओ गेम्स, म्यूझिक सीडी विकता येतील आणि नव्या वस्तूही खरेदी करता येतील.

अमेझॉनने ही सेवा Junglee या वेबसाईटसोबत सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांना विक्रेता म्हणून नोंदणी करण्यासाठी Junglee वर जाऊन नोंदणी करावी लागेल. Junglee वेबसाईट देखील अमेझॉनच्या मालकीचीच आहे. हे वेबसाईट एक हजार रुपयांपर्यंतच्या वस्तूंवर 10 रुपये शुल्क घेईल, तर 5 हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या वस्तूंवर 100 रुपये शुल्क घेणार आहे.

ग्राहकांना वस्तू विकायची असल्यास कुठेही जाण्याची गरज नाही. अमेझॉनकडून तुमच्या दारात येऊन वस्तू नेली जाईल आणि त्याची किंमत ठरवण्याचाही अधिकार ग्राहकाला असेल.