French Open 2022: प्रथमच फ्रेंच ओपन खेळणाऱ्या चीनच्या 19 वर्षीय झेंग क्विनवेनला (Zheng Qinwen) चौथ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या महिला खेळाडू इगा स्विटेककडून (Iga Swiatek) पराभव पत्करावा लागलाय. या पराभवानंतर झेंग क्विनवेननं आपलं दु:ख व्यक्त केलं. तसेच आपल्या पराभवाला पीरियड्स कारणीभूत असल्याचं तिनं म्हटलंय. झेंग प्रथमच रोलँड गॅरोस येथे खेळत होती आणि तिनं अव्वल मानांकित स्वितेकविरुद्ध चांगली सुरुवात केली. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये झेंगनं उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या सेटमध्ये तिनं इगा स्विटेकला पराभूत केलं. मात्र, पुढच्या दोन सेटमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळं जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानी असलेल्या खेळाडूला पराभूत करण्याचं तिचं स्वप्न भंगलंय. 


पहिल्या सेटमध्ये झेंग क्विनवेनची दमदार कामगिरी
पहिल्या सेटमध्ये झेंगनं चांगला खेळ दाखवला. तिनं 6-7 च्या फरकानं स्विटेकला पराभूत करून पहिला सेट जिंकला. मात्र, त्यानंतर झिंगला दुसऱ्या सेटमध्ये 6-0 आणि तिसऱ्या सेटमध्ये 6-2 पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह तिचा फ्रेंच ओपनमधील प्रवास संपलाय. 


पोटदुखीमुळं झेंगच्या खेळावर परिणाम
या सामन्यादरम्यान जागतिक क्रमवारीत 74व्या क्रमांकाची महिला खेळाडू झेंगच्या पायाला दुखापत झाल्यानं तिला उपचारासाठी विश्रांती घ्यावी लागली. पण तिच्या पराभवाचं खरं कारण काही वेगळेच होतं. पोटदुखीमुळं तिच्या खेळावर परिणाम झाला आणि तिला पराभवाला सामोरं जावं लागलंय.


सामन्यानंतर काय म्हणाली झेंग?
"माझ्या दुखापतीपेक्षा मला परियड्सबद्दल जास्त काळजी वाटत होती. सामन्यापूर्वी मला परियड्सचा त्रास होऊ लागला आणि माझं पोट दुखू लागलं. वेदना असह्य झाल्यामुळं मला खेळणं खूप कठीण जात होतं. मासिक पाळीचा पहिला दिवस माझ्यासाठी नेहमीच खूप कठीण असतो. मी निसर्गाच्या विरोधात जाऊ शकत नाही, पण जर मी मुलगा असतो तर मला हा पराभव सहन करावा लागला नसता."


हे देखील वाचा-