France Riots FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकाचा (FIFA World Cup 2022) खिताब अर्जेंटिनानं (Argentina) पटकावला असून अंतिम सामन्यात फ्रान्सचा (France) पराभव पत्करावा लागला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये (Penalty Shootout) सामन्यात अर्जेंटिनानं 4-2 असा विजय मिळवला. पण अर्जेंटिनासाठी हा विजय सोपा नव्हता. फ्रान्सनं अर्जेंटिनाला कडवी झुंज दिली. फ्रान्सच्या पराभवानंतर खेळाडूंसोबतच चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू तराळल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचसोबत पराभवानंतर फ्रान्समध्ये काही चाहत्यांचा संयम सुटल्याचं पाहायला मिळालं. फिफामधील (FIFA News) संघाच्या पराभवानंतर फ्रान्समध्ये विविध शहरांत दंगल उसळल्याची माहिती मिळत आहे. 


स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, अर्जेंटिनाच्या हातून झालेल्या पराभवानंतर पॅरिसमध्ये भीषण हिंसाचार झाला आणि चाहत्यांनी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली. येथे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. 


फिफा विश्वचषक फायनलसाठी फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. फ्रान्समध्ये अनेक ठिकाणी विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या पडद्यावर सामना लाईव्ह पाहिला जात होता. दरम्यान, सामना जसाजसा रंगात येत होता. तसेतसे चाहत्यांच्या काळजाचे ठोकेही वाढत होते. अखेर अटीतटीच्या लढतीत फ्रान्सचा पराभव झाला आणि चाहत्यांचा बांध सुटला. 




पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला पराभवाला सामोरं जावं लागताच परिस्थिती अनियंत्रित झाली. विविध शहरांतून हिंसाचाराच्या बातम्या आल्या. पॅरिसशिवाय लायनमध्येही पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, इथेही चाहत्यांनी वाहनं पेटवली. चाहत्यांना आवर घालण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. 


फ्रान्सच्या वेगवेगळ्या शहरांमधून काही व्हिडीओ आणि फोटो समोर आली आहेत. ज्यात लोक गाड्यांची तोडफोड करताना आणि त्यांना आग लावताना दिसत आहेत. पॅरिसमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. कारण लाखो चाहते रस्त्यावर उतरले होते. अशातच अंतिम फेरीतील पराभवानंतर चाहत्यांचा बांध सुटला आणि ठिकठिकाणी हिंसाचाराला सुरुवात झाली.  


फिफा विश्वचषक फायनललचा सामना कतारमधील लुसेल स्टेडियमवर खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. या सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमधून झाला. सामन्याची नियोजित वेळ संपली तेव्हा स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. फ्रान्ससाठी या सामन्यात एम्बाप्पेनं हॅट्ट्रिक केली, तर लियोनेल मेस्सीनं दोन गोल केले. अर्जेंटिनानं हा विश्वचषक पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला आणि 36 वर्षांचा दुष्काळ संपवला.


महत्त्वाच्या इतर बातम्या: 


FIFA Prize Money: फक्त विजेताच नाहीतर, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट; कोणाला मिळणार किती Prize Money?