नवी दिल्ली: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांची कबुली दिली आहे.  दानिश कनेरियावर बंदी घातल्यानंतर जवळपास सहा वर्षांनंतर त्याने याबाबतची कबुली दिली. इतकंच नाही तर खोटेपणाचं ओझं घेऊन आयुष्यभर जगू शकत नाही, असं दानिश कनेरियाने म्हटलं आहे.  ईएसपीएन वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दानिश कनेरियासोबत फिक्सिंगमध्ये त्याचा एसेक्स या संघातील सहकारी मर्विन वेस्टफील्डही सहभागी होता.


 37 वर्षीय माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ‘अल जजीरा’ला दिलेल्या मुलाखतीत आपला गुन्हा कबुल केला आहे. “माझं नाव दानिश कनेरिया आहे, माझ्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाद्वारे 2012 मध्ये लावण्यात आलेल्या आरोपांचा स्वीकार करतो”, असं दानिशने म्हटलं आहे.

मी मनाची तयारी करुन हा निर्णय (आरोपांच्या कबुलीचा) घेतला आहे. कारण तुम्ही खोट्याच्या आधारे आयुष्य जगू शकत नाही, असं दानिशने सांगितलं.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दानिश कनेरियाला 2010 मध्ये वेस्टफील्डसोबत अटक केलं होतं. मात्र पुराव्यांअभावी दोघांनाही सोडण्यात आलं. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर आजीवन बंदी घातली आहे.दुसरीकडे दानिश इतकी वर्षे स्वत:वरील आरोपांपासून लपण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आता त्याने खरं सांगून मनावरील ओझं उतरवण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानकडून खेळताना दानिश कनेरियाने 61 कसोटीत 261 विकेट घेतल्या. तर 18 वन डे सामन्यात 15 फलंदाजांना बाद केलं. भारताविरुद्ध तर दानिश कनेरियाने एकूण 43 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या

पाकचा हिंदू क्रिकेटपटू दानिश नागरिकत्व स्वीकारण्यास भारतात?  

पाकिस्तानी क्रिकेटची 'नापाक' बाजू