कराची : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाहिद आफ्रिदी याने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मी लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंतीही शाहिदने चाहत्यांना केली आहे. या बातमी शाहिदच्या अनेक चाहत्यांनी ट्विट करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.


शाहिद आफ्रिदी म्हणतो..
आपल्या ट्विटमध्ये शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे की, "गुरुवारपासून मला बरे वाटत नाहीये. माझं अंग खूपच दुखत आहे. माझी कोरोना टेस्ट करण्यात आली आणि दुर्दैवाने कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लवकरच बरा होण्यासाठी प्रार्थनांची आवश्यकता आहे". दरम्यान, शाहिद आफ्रिदीचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह येणारा दुसरा पाकिस्तानचा खेळाडू आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी फलंदाज तौफिक उमर याला देखील कोरोनाची लागण झाली होती. तौफिक उमर हा उपचारानंतर बरा होऊन घरी परतला आहे.





पाकिस्तानमध्ये कोरोनाचा कहर
पाकिस्तानात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दीड लाखांच्या जवळ गेली आहे. यापैकी 50 हजार रुण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे पाकिस्तानात आतापर्यंत अडीच हजाराच्या आसपास नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.


भारताला आजपर्यंत सौरव गांगुलीसारखा उत्तम कर्णधार लाभला नाही; शोएब अख्तरकडून कौतुक


जगभरात कोरोना 77 लाखांहून अधिक कोरोनाबाधित
जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 77 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर या महामारीमुळं मृतकांची संख्या आता चार लाख 27 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 1 लाख 40 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 77 लाख 25 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 27 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 39 लाख 19 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 60 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांच्या घरात आहे.


Shahid Afridi Tested Corona Positive | पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला कोरोना