Ambati Rayudu : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश केला आहे. 37 वर्षीय रायडू जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षात सामील झाला आहे. निवृत्तीनंतर, माजी भारतीय क्रिकेटर आज गुरुवारी (28 डिसेंबर) अधिकृतपणे राजकीय पार्टीमध्ये सामील झाला. युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्याने पक्षात प्रवेश केला. सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असताना रायडूने राजकीय पक्षात प्रवेश केला. अशा स्थितीत पक्ष त्यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट देणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.






गुंटूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याला दिली भेट


रायुडूने 29 मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्याने आपल्या मूळ गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्याला भेट दिली आणि समस्या समजून घेण्यासाठी लोकांची भेट घेतली.


राजकारणात येण्याचे दिले होते संकेत 


हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, त्याने बुधवारी (27 डिसेंबर) प्रसारमाध्यमांना सांगितले की, "लोकांची सेवा करण्यासाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. राजकारणात येण्यापूर्वी मी लोकांची नाडी जाणून घेण्याचा आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. 


'मी ठोस कृती आराखडा घेऊन येईन'


तो म्हणाला होता की, "राजकारणात कसे जायचे आणि कोणते व्यासपीठ निवडायचे यावर मी एक ठोस कृती योजना तयार करेन." दरम्यान, रायुडूने 2024 मध्ये गुंटूर किंवा मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या अंदाज फेटाळून लावले आहेत.


भारतासाठी 55 एकदिवसीय सामने खेळले


रायुडूने भारतासाठी 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने 47 पेक्षा जास्त सरासरीने 1694 धावा केल्या. रायुडूने वनडेमध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. त्याने 3 विकेट्सही घेतल्या आहेत. त्यावेळी रायडूने 6 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 10.50 च्या सरासरीने 42 धावा केल्या. याशिवाय रायुडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6151 धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए मध्ये 5607 धावा केल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या