मिलान : तब्बल चार वेळा चॅम्पियन ठरलेला इटलीचा संघ 60 वर्षात पहिल्यांदाच फिफा विश्वचषकासाठी अपात्र ठरला. स्वीडनसोबत झालेल्या प्लेऑफमध्ये इटलीला सामना अनिर्णित ठेवण्यास भाग पडलं. त्यामुळे 1958 नंतर यंदा पहिल्यांदाच फिफा विश्वचषकात इटलीचा संघ खेळताना दिसणार नाही.


प्लेऑफच्या सामन्यात स्वीडनने इटलीला एकही गोल करु दिला नाही. त्यामुळे हा सामना 0-0 ने अनिर्णित राहिला. फुटबॉलच्या इतिहासात इटलीचा संघ दुसऱ्यांदा फिफासाठी अपात्र ठरला. यापूर्वी 1930 आणि 1958 मध्ये स्वीडनमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी इटलीचा संघ अपात्र ठरला होता.

फिफा विश्वचषकात इटलीच्या संघाला चार वेळा विश्वविजेता होण्याचा मान मिळाला. पण यावेळी प्लेऑफच्या सामन्यात सर्वाधिक वेळ बॉल आपल्याकडेच ठेवूनही, इटलीच्या फुटबॉलपटूंना एकदेखील गोल करता आला नाही.

प्लेऑफच्या पहिल्या फर्स्ट हाफमध्ये मिड फिल्डर जॅकब जोहान्सनच्या गोलमुळे स्वीडनला 1-0 असा विजय मिळाला. त्यामुळे दुसऱ्या हाफमध्ये होम ग्राऊंडवर इटलीला कोणत्याही परिस्थितीत स्वीडनचा 2-0 ने पराभव करणं गरजेचं होतं. पण यात इटलीच्या फुटबॉलपटूंना अपयश आलं.

इटलीच्या अपयशामुळे स्वीडनचा संघ 2006 नंतर पहिल्यांदा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

यंदा रशियामध्ये फिफा विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. या टुर्नामेंटमध्ये इटलीचा संघ दिसणार नसल्याने इटलीतील लाखो फुटबॉलप्रेमींचा हिरमोड झाला आहे.