मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली-2’ मधील एक स्टंट तरुणाला चांगलाच भोवला आहे. सिनेमातील अभिनेता प्रभासने हत्तीच्या सोंडेचं चुंबन घेऊन, सोंडेवरुन हत्तीवर स्वार होण्याचे दृश्य दाखवण्यात आलं आहे. असाच स्टंट करताना तरुणाला हत्तीने दिलेल्या टक्करेने तरुण जागीच बेशुद्ध झाला. ही घटना केरळमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.


दाक्षिणेतील न्यूज चॅनेल मनोरामाने दिलेल्या वृत्तानुसार, एका तरुणाने हत्तीला काहीतरी खायला देऊन, त्याच्या सोंडेचं चुंबन घेतलं. पण हत्तीला तरुणाची ही कृती आवडली नाही. त्याने त्याला जोराची धडक दिली. यात तरुण लांबवर जाऊन पडला.

यावेळी या तरुणाचा मित्र फेसबुक लाईव्ह करत होता. आपला मित्र लांबवर जाऊन पडल्यानंतर त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून, तो तत्काळ त्याच्याजवळ धावत गेला. पण त्यावेळी तो बेशुद्ध पडला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका तरुणाला बाहुबालीतल्या गाण्यातील दृश्याची कॉपी करताना आपला जीव गमवावा लागला. या तरुणाने स्टंटबाजीच्या नादात शाहपूर जवळच्या माहुली किल्ल्यातील धबधब्यावरुन उडी मारली. पण यातच त्याचा मृत्यू झाला.

वास्तविक, सिनेमा रिलीज झाल्यापासून त्यात चित्रित झालेल्या अनेक स्टंटनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. पण सिनेमातील या स्टंटसाठी स्पेशल इफेक्टचा वापर केला होता. या सिनेमात अभिनेता प्रभासचे हत्तीसोबत अनेक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यातील काही ठिकाणी हात्ती खरा असला तरी, सर्वाधिक ठिकाणी व्हिज्युअल्स इफेक्ट द्वारेच हे स्टंट दाखवले होते.