Asian Games 2023, hockey : पुरुष हॉकीमध्ये (hockey) भारत (India) पुन्हा एकदा आशियाई चॅम्पियन ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारताने हांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत सनसनाटी कामगिरी केली. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत 2018 च्या चॅम्पियन जपानचा 5-1 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. महत्त्वाचे म्हणजे, भारताने पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही जागा निश्चित केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष आणि महिला हॉकीमधील सुवर्णपदक विजेत्यांनाच ऑलिम्पिक प्रवेशाची खात्री आहे आणि भारतीय संघाने हे काम प्रभावी कामगिरीसह केले. त्यामुळे नवीन प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनाही अभिमान वाटला असेल. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉकीच्या जादूने सर्वांनाच चकित केले. भारताकडून मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास आणि अभिषेक यांनी गोल केले, तर जपानला केवळ एकच गोल करता आला.


1966, 1998 आणि 2014 नंतर भारतासाठी पुरुष हॉकीमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत हे भारताचे चौथे सुवर्णपदक होते. 4 वर्षांपूर्वी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्यपदक मिळवले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत हा हॉकीमधील संयुक्त दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी पुरुष संघ ठरला. कारण त्यांनी दक्षिण कोरियाच्या ४ सुवर्णपदकांची बरोबरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 9 सुवर्ण पदकांसह पाकिस्तान सर्वात यशस्वी पुरुष संघ आहे.


41 वर्षात प्रथमच संघाची दिमाखदार कामगिरी 


भारतीय हाॅकी संघाने गेल्या 41 वर्षांमध्ये प्रथमच आॅलिम्पिक, आशियाई गेम्स आणि काॅमनवेल्थे गेम्समध्ये संघाने पदक जिंकून दमदार कामगिरी केली आहे. 


9 वर्षानंतर भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले


टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने तब्बल 9 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारताकडून हरमनप्रीत सिंग (32वे आणि 59 वे मिनिट), अभिषेक (48मिनिट), अमित रोहिदास (36 मिनिट) आणि मनप्रीत सिंग (25 मिनिट) यांनी गोल केले. जपानकडून एकमेव गोल एस. तनाकाने 51व्या मिनिटाला केला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केला. 15व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण अमित रोहिदासचा फ्लिक थेट जपानच्या गोलकीपरसमोर गेला.


दुसरीकडे, भारतीय संघाला चिअर करण्यासाठी क्रिकेट संघ आला होता. या अभिमानास्पद क्षणासाठी स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येक भारतीय टीम इंडियाचा जयजयकार करत होता. सामना संपण्यासाठी हूटर वाजताच भारतीय हॉकी संघ आणि चाहते आनंदात गेले.


इतर महत्वाच्या बातम्या