नांदेड : नांदेडमधील (Nanded)  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय (Government Hospital) परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाल्याचं चित्र होतं. मागील तीन ते चार दिवसांपासून सातत्याने या शासकीय रुग्णालयावर टीकेचं सत्र सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आलाय. त्यासाठी शंभरपेक्षा अधिक डुकरांना तीन गाड्यांमध्ये भरुन कोंडवाड्यात टाकण्यात आले. त्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला. 


डुकरांमुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं. त्यातच हा रुग्णालयाचा परिसर असल्यामुळे रुग्णांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. त्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी वारंवार मागणी केली जात होती. तर आता हा परिसर स्वच्छ करण्यात आला असून या परिसरातील डुकरांना देखील आता कोंडवाड्यात पाठवण्यात आले आहे. 


शासकीय रुग्णालयाच्या परिसरात घाणीचं साम्राज्य


मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नांदेडमधील विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात  नांदेड, परभणी, हिंगोली यासह विदर्भातील यवतमाळ आणि तेलंगणा या राज्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. जवळपास 500 खाटांच हे रुग्णालय आहे. मात्र सद्य स्थितीमध्ये एकूण 1200 रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु या रुग्णालयाच्या परिसरात जागोजागी पडलेला कचरा, त्यावर तुटून पडणारा डूकरांचा कळप आणि पाण्याअभावी वॉर्डातील स्वच्छतागृहातून येणारी दुर्गंधी यामुळे रूग्णांसह नातेवाईक त्रस्त झाले होते. 


या रुग्णालयाच्या परिसरातच असलेल्या धर्मशाळेच्या बाजूलाच कचऱ्याचा डंपिंग ग्राउंड तयार केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार इथे सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असते.  यासंबंधी अनेक वेळा नातेवाईकांनी रूग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. पंरतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. दरम्यान रुग्णालयात मृतांची संख्या ही दिवसागणिक वाढत चालल्याचं पाहायला मिळतय. त्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दरम्यान गुरुवारी महापालिकेच्या 70  सफाईकामगारांनी परिसर स्वच्छ करण्यात आला. 


चार तासांत गोळा केला पाच ट्रॅक्टर कचरा  


70  सफाईकामगारांनी चार तास या परिसराची स्वच्छता केली. या कालावधीमध्ये त्यांनी पाच ट्रॅक्टर कचरा गोळा केला. महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशावरून स्वच्छता उपायुक्त गुलाम सादिक यांच्या मार्गदर्शनाखील स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.गुरुवार (5 ऑक्टोबर) रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेमध्ये 40 महिला आणि 30 पुरुषांनी परिसरात स्वच्छ करुन पाच ट्रॅक्टरमध्ये दोन टन कचरा जमा केला. 


हेही वाचा : 


Nanded Hospital Death : नवजात बालकासह आईचाही मृत्यू, रुग्णालयात एकच आक्रोश; नांदेडमधील मृत्यूचे तांडव सुरूच