Sunil Chhetri Announces Wife's Pregnancy : भारतीय फुटबॉल संघाचा (Indian Football Team) कर्णधार (Captain) सुनील छेत्री (Sunil Chhetri) यानं चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. सुनील छेत्री लवकरच बाबा होणार आहे. सुनील छेत्री यानं ही गुड न्यूज चाहत्यांसोबत खास अंदाजात शेअर केली आहे. इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेदरम्यानच्या सामन्यात सुनील छेत्रीनं ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सुनिल छेत्री बाबा होणार
सोमवारी इंटरकॉन्टिनेंटल कप 2023 स्पर्धेतील वानुआतू आणि भारत यांच्यात सामना झाला. हा सामना भारताने 1-0 असा जिंकला. या सामन्यात सुनील छेत्रीनं भारतासाठी गोल केला. हा या सामन्यातील एकमेव गोल ठरला. यानंतर, सुनिल छेत्रीनं भारताचा विजय साजरा करत खासप्रकारे पत्नीच्या गरोदरपणाची घोषणा केली.
खास अंदाजात चाहत्यांना दिली गुड न्यूज
भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर सोमवारी भारत आणि वानुआतू यांच्यात फुटबॉल सामना रंगला. या सामन्यात ब्लू टायगर्स अर्थात भारताने 1-0 ने विजय मिळवला. या सामन्यात सुनील छेत्रीने 81व्या मिनिटाला अप्रतिम गोल करत भारताला 1-0 असा विजय मिळवून दिला. या गोलनंतर सुनील छेत्रीने आपल्या संघाचा विजय आणि पत्नीच्या गरोदरपणाची गोड बातमी अनोख्या पद्धतीने शेअर केली.
पाहा व्हिडीओ :
सुनील छेत्रीचं मैदानात अनोखं सेलिब्रेशन
सुनील छेत्रीनं आपल्या टी-शर्टमध्ये फुटबॉल ठेवला आणि आपली पत्नी गरोदर असल्याचे हावभाव केले. हे पाहून सुनील छेत्रीची पत्नीही स्टँडवर बसून टाळ्या वाजवताना आणि हसताना दिसली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते सुनील छेत्री आणि त्याची पत्नी सोनमचं अभिनंदन करत आहेत. सुनील छेत्री आणि सोनम यांनी 4 डिसेंबर 2017 मध्ये लग्नगाठ बांधली.
पहिल्या बाळाची आतुरतेनं वाट पाहतायत सुनील आणि सोनम
सुनील छेत्री आणि सोनम त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. सामना जिंकल्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन दरम्यान सुनील छेत्री म्हणाला की, "मी आणि माझी पत्नी आमच्या पहिल्या बाळाची वाट पाहत आहोत. माझ्या पत्नीला हे अशाप्रकारे या गोड बातमीची घोषणा करायची होती. हे तिच्या आणि माझ्या बाळासाठी आहे. मला आशा आहे की, तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी असतील.''
इंटरकॉन्टिनेंटल मालिकेत भारताची कामगिरी
इंटरकॉन्टिनेंटल कप 2023 स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने सोमवारी वानुआटूला 1-0 ने पराभूत केलं. त्यापूर्वी शुक्रवारी त्यांच्या सलामीच्या सामन्यात मंगोलियाचा 2-0 असा पराभव केला. सध्या भारत 2 पैकी 2 वेळा जिंकून सहा गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. शेवटच्या राऊंड-रॉबिन लीग सामन्यात गुरुवारी भारताचा सामना लेबनॉनशी होईल. या लीगचा अंतिम सामना रविवार, 18 जून रोजी होणार आहे.