Latur News : उत्कृष्ट ड्रिबलिंगचे कौशल्य आणि शारीरिक क्षमतेच्या जोरावर लातूरच्या (Latur) स्वराज महेश सावंतने (Swaraj Sawant) एफसी बायर्न कप फुटबॉल स्पर्धेत दमदार खेळी करत आपल्या संघाला विजय तर मिळवून दिलाच सोबतच जर्मनी (Germany) येथे होणाऱ्या फुटबॉल (Football) प्रशिक्षणासाठी आपली निवड पक्की केली आहे.


बाल फुटबॉलपटूंना उच्चप्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्याच्या क्रीडा विभागाने जर्मनी येथील एफसी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) या अग्रगण्य फुटबॉल क्लबशी करार केला आहे. त्यानुसार 14 वर्षांखालील खेळाडूंना जर्मनीत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत एफसी बायर्न कप फुटबॉल स्पर्धेचे जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून उत्तम अशा 20 खेळाडूंना जर्मनी येथे येत्या काही दिवसांत प्रशिक्षण मिळणार आहे. स्वराजने पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधिनीचे प्रतिनिधित्व करत छाप सोडली.


राज्य सरकारचा जर्मनीतील एफसी बायर्न म्युनिक संघासोबत सामंजस्य करार


महाराष्ट्रातील फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने एफसी बायर्न म्युनिक या जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबसोबत सामंजस्य करार केला आहे. फुटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य सरकारने एफसी बार्यन महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या पातळीवर सुमारे 1 लाख खेळाडू फुटबॉलचा सराव करत होते. 3 मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधिनीच्या 14 वर्षे वयाखालील खेळाडूच्या संघाने मुंबई टीमचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने स्वराज महेश सावंत याने उत्तम कामगिरी केली. त्याची आणि त्याच्या टीमची जर्मनीतील एफसी बायर्न म्युनिक या क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. स्वराज सावंत याच्या नेतृत्वात एप्रिलमध्ये ही टीम जर्मनीला रवाना होणार आहे. अवघ्या तेराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ खेळण्यासाठी निवड झालेला मराठवाड्यातील हा पहिलाच खेळाडू आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी 14 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता स्वराज सावंत आणि त्याच्या सहकारी खेळाडूंचा गौरव समारंभ आयोजित केला आहे. या निमित्त आयोजित भोजनास सरकारने सावंत याच्या पालकांनाही निमंत्रित केले आहे. आपली ही निवड झाल्याचे श्रेय स्वराज सावंत याने प्रशिक्षक धीरज मिश्रा, सहाय्यक श्री शिवराज आणि पालकांना दिले आहेत. स्वराज सावंत याच्या या निवडीचे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी अभिनंदन केले आहे.


स्वराज मराठवाड्याचा एकमेव खेळाडू....


जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी निवड झालेला स्वराज मराठवाड्यातील एकमेव खेळाडू असून, त्याने एफसी बायर्न फुटबॉल स्पर्धेत उत्तम मिडफिल्डर असल्याचे सिद्ध केले आहे. जिल्हा ते राज्यस्तरापर्यंत जवळपास 50 हजार खेळाडू खेळले असले तरी यातील उत्कृष्ट अशा 20 खेळाडूंनाच जर्मनी येथे प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या 20 मधील स्वराज तिसरा खेळाडू ठरला आहे